लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे फार पूर्वीपासून आपली वडीलधारी मंडळी आपल्याला सांगत आली आहेत. पृथ्वीवरची लोकसंख्या वाढली तशी बहुधा स्वर्गातील मंडळींनाही लग्नगाठी जुळवून आणण्याचे काम पृथ्वीवर आऊटसोर्स करावे लागले असावे. कारण, उपग्रहाच्या माध्यमातून इथे-तिथे सर्वत्र संचार असलेल्या टीव्ही नावाच्या एका छोटय़ा यंत्राने सध्या फार मोठी कमाल साधली आहे. म्हणजे, हे यंत्र घराघरात शिरल्यानंतर घरातील आईला आपला मुलगा म्हणजे ‘श्री’ सारखाच आहे हो.. त्याला ‘जान्हवी’सारखीच सून हवी, असे मनोमन पटायला लागले. नाही, तशा टिप्पण्या वधू-वर मंडळातील अपेक्षांच्या यादीतही जोडल्या जाऊ लागल्या. पण आता हे छोटय़ा पडद्यावरच्या कुटुंबांप्रतीचं प्रेम इतकं वाढलं आहे की, पाहणाऱ्यांना जर वास्तवात श्री आणि जान्हवी नवरा-बायको झाले नाहीत तर कसंसंच होऊ लागतं. मालिकेतील बावरी राधा बाहेर कार्यक्रमात कुठेही दिसली की तिला पहिला प्रश्न विचारला जातो, ‘सौरभ कुठे आहे?’ पण, हे असं फक्त प्रेक्षकांचंच होतं आहे असं नाही, तर ते त्या पडद्यावर नवरा-बायको बनून खोटं-खोटं संसाराचं चित्र प्रेक्षकांसमोर रंगवणाऱ्या कलाकारांच्या बाबतीतही होऊ लागलं आहे. आणि म्हणून पहिल्याच मालिकेत एकत्र येणारे नायक आणि नायिका मालिका संपायच्या आधीच ‘श्री आणि सौ’ बनून बाहेर पडण्याची संख्या आता वाढू लागली आहे. म्हणजे चार-पाच वर्षांपूर्वी एकता कपूरच्या दीर्घकाळ चाललेल्या ‘क’ मालिकेतील बहुतेक जोडय़ा या आता लग्नाच्या बेडीत अडकल्या आहेत. दररोज एक भाग दाखवायचा तर ही मंडळी दिवसाचे १६ ते १८ तास कॅमेऱ्यासमोर खोटे नवरा-बायको बनून वावरत असतात. एवढा वेळ एकत्र राहिल्यानंतर मालिकेचं युनिट म्हणजे आपलं दुसरं कुटुंब आहे असं कोणी म्हटलं तर त्यात काही वावगं नाही. त्यामुळे सध्या ज्या वेगाने मालिकेतील जोडपी प्रत्यक्षातही संसारचित्र रंगवण्यासाठी आसुसतात त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. मराठी मालिकांमध्ये हे लोण इतक्या वेगाने पसरलं नव्हतं, पण आता हळूहळू तिथेही चित्र पालटू लागलं असल्याची खूण ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील श्री आणि जान्हवीच्या उदाहणावरून दिसून आले आहे. ‘श्री’ आणि ‘जान्हवी’ यांचे मालिकेत तर लग्न झाले. मात्र आता शशांक आणि तेजश्री प्रत्यक्ष आयुष्यातही लग्न करत असल्याची ठोस बातमी मिळत आहे. छोटय़ा पडद्यावर जुळलेल्या जोडय़ांपैकी शशांक आणि तेजश्री ही पहिलीच जोडी नाही. मराठी आणि हिंदीच्या छोटय़ा पडद्यावर जुळलेल्या अशा खास लग्नगाठींची एक खास झलक..
आदेश बांदेकर-सुचित्रा बांदेकर
श्री. ना. पेंडसे यांच्या ‘रथचक्र’ या कादंबरीवर आधारित ‘रथचक्र’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर एकमेकांना जास्त ओळखायला लागले. तेथेच या दोघांचे सूत जुळले. पुढे नात्यामध्ये राहून तब्बल चार वर्षांनी या दोघांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाला येत्या १४ नोव्हेंबर रोजी २३ वर्षे पूर्ण होतील. छोटय़ा पडद्यामुळे जुळलेल्या जोडय़ांपैकी ही काहीशी आद्य जोडी म्हणावी लागेल. ‘मनोरंजनाच्या क्षेत्रातील दोघांनी एकत्र येऊन लग्न करण्यासाठी इतर जोडप्यांपेक्षा जास्त विश्वासाची गरज असते. त्याशिवाय असूया नसली, की मग काहीच प्रश्न नसतो. या क्षेत्रातील लोकांची लग्ने टिकत नाहीत, असे बोलले जाते. मात्र सुदैवाने मराठीत तरी मनोरंजन क्षेत्रातील लग्ने खूपच चांगली टिकली आहेत,’ असा विश्वास आदेश बांदेकर यांनी व्यक्त केला आहे. 
उमेश कामत – प्रिया बापट
प्रिया बापट आणि उमेश कामतच्या प्रेमाचे समीकरण आधीपासूनच जुळलेले असले तरी झी मराठीच्या ‘शुभंकरोति’ मालिकेत प्रेक्षकांनी या जोडीला एकत्र पाहिले. मालिका संपल्यानंतर ही जोडी विवाहबंधनात अडकली त्यामुळे प्रेक्षकांना आपली आवडती जोडी संसारात रमल्याचा आनंद मिळाला.
हितेन तेजवानी – गौरी प्रधान
एकता कपूरच्या ‘कुटुंब’ या मालिकेत हितेन तेजवानी आणि गौरी प्रधान मुख्य भूमिकेत होते. त्याहीआधी त्यांनी ‘ब्रीझ’ साबणाच्या जाहिरातीत एकत्र काम केले होते. पण, ‘कुटुंब’ मालिके च्या चित्रीकरणादरम्यान हितेनच्या लाघवी स्वभावाने गौरीला मोहून टाकले होते. मालिके चे चित्रीकरण सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांनीच या दोघांनीही शुभमंगल करून घेतले.
राम कपूर – गौतमी गाडगीळ
आमची ‘बिनधास्त’ मराठी मुलगी गौतमी गाडगीळ आणि पंजाब दा पुत्तर राम क पूर हे दोघेही एकताबाईंच्याच ‘घर एक मंदिर’ या मालिकेत एकत्र आले. हे दोघेही भेटले तेव्हा गौतमीने पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला होता. मालिका संपता संपता गौतमी गाडगीळची ‘कपूर’ झाली. पण या जोडीला ओळखणारी कलाकार मंडळी गौतमीमुळे राम पूर्णपणे बदलल्याचे सांगतात. आज जो शांत, संयमी राम कपूर प्रेक्षकांना मोहून टाकतो आहे त्याचे सगळे श्रेय गौतमीच्या प्रेमाला असल्याचे सांगितले जाते.
मानव गोहिल-श्वेता कावात्रा
पुन्हा एकदा एकताबाईंच्याच ‘कहानी घर घर की’ या मालिकेतील हे जोडपं चित्रीकरणादरम्यान प्रेमाच्या नात्याने जोडलं गेलं. श्वेता आणि मानव दोघांनीही झट मंगनी पट ब्याह.. करत आपल्या प्रेमकथेला वास्तवात उतरवले.
करण सिंग ग्रोव्हर – जेनिफर विंजेट
करण आणि जेनिफरची जोडी जमली ती ‘दिल मिल गए’च्या सेटवर. या दोघांमध्ये घनिष्ट मैत्री होती. पण करणचे लग्न अभिनेत्री श्रद्धा निगम हिच्याशी झाले होते. श्रद्धाशी घटस्फोट घेतल्यानंतर जेनिफर आणि करणने आपले प्रेमाचे नाते विवाहात बदलण्याचा निर्णय घेतला.
गुरमीत चौधरी – देबिना चॅटर्जी
‘रामायण’ मालिकेत राम आणि सीतेची भूमिका निभावताना हे दोघेही कधी प्रेमात पडले त्यांचे त्यांनाच कळले नाही. फार काळ लपवाछपवी न करता या दोघांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला. आता ही जोडी ‘नच बलिए’च्या नव्या पर्वात एकत्र दिसणार आहे.
नंदीश-रश्मी
‘उतरन’ मालिकेतील वीर (नंदीश) आणि तपस्या (रश्मी) पडद्यावर तरी एकमेकांचा तिरस्कार करायचे, पण प्रत्यक्षात मात्र गोष्टी वेगळ्या होत्या. तरी आपल्यातले नाते नेमके  समजून घ्यायला या जोडप्याने चांगलाच वेळ घेतला.