केनियाच्या धावपटूंसह मान्यवरांची हजेरी

परभणी महापौर राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटनासाठी केनियाच्या धावपटूसह सिनेअभिनेता संजय नार्वेकर यांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती आयोजक महापौर प्रताप देशमुख यांनी दिली.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय परभणी महापौर मॅरेथॉन स्पर्धेचे १२ डिसेंबरला आयोजन करण्यात आले आहे. वसमत रस्त्यावरील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावरून ही स्पर्धा सुरू होणार आहे. या वेळी उद्घाटनासाठी सिनेअभिनेता संजय नार्वेकर, धावपटू हिलरी कोच, सॅमी किमेलीलिमो, निकोलस किमेली कोरीर या केनियाच्या आंतरराष्ट्रीय धावपटूंना निमंत्रित केले आहे. स्पर्धेच्या माध्यमातून स्त्री भ्रूणहत्या थांबवा व लेक वाचवा या संदेशाचे जनजागरण करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्य़ात व शहरात स्वागतकमानी उभारल्या जाणार आहेत. मुख्य शर्यतीच्या पुढे राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते दुचाकीवर रॅलीत सहभागी होणार आहेत. याच वेळी अभिनेता नार्वेकर यांचा रोड शोही होणार आहे. स्पर्धा एकूण पाच गटांत होणार आहे. खुल्या गटासाठी २१ किलोमीटर अंतर असून, प्रथम बक्षीस ५१ हजार ७२, द्वितीय बक्षीस ३१ हजार ७२, तृतीय बक्षीस  २१ हजार ७२, चौथे बक्षीस ११ हजार ७२ या शिवाय ५ हजार ७२ रुपयांचे प्रत्येकी १० उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील.
ब गटातील स्पर्धा १७ ते २० वर्षांसाठी परभणी जिल्ह्य़ातील मुलांसाठी आहे. १२ किलोमीटर अंतराच्या या स्पर्धेसाठी १० हजार ७२, ७ हजार ७२, ५ हजार ७२, ३ हजार ७२ या शिवाय प्रत्येकी २ हजार ७२ रुपयांची सहा उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील. १३ ते १७ वयोगटासाठी परभणी जिल्ह्य़ातील मुला-मुलींसाठी असून ५ हजार ७२, ३ हजार ७२, २ हजार ७२, १ हजार ५७२ या शिवाय १ हजार ७२ रुपयांची सहा उत्तेजनार्थ बक्षिसे आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना राज्यस्तरीय प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
दहा रुपये नोंदणी शुल्कासह राज्यभरातील धावपटूंनी रणजित काकडे, कैलास टेहरे, बंटी सोनसळे किंवा चॅम्पियन स्पोर्ट्स जलतरणिका कॉम्प्लेक्स, स्टेडियम परभणी येथे ११ डिसेंबपर्यंत नोंदणी करून चेस्ट नंबर घ्यावेत. अधिक माहितीसाठी परभणी जिल्हा अ‍ॅथलॅटिक संघटनेचे सचिव तथा स्पर्धा समन्वयक प्रा. डॉ. माधव शेजुळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक महापौर प्रताप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार, जिल्हा अ‍ॅथलॅटिक संघटनेचे अध्यक्ष प्रा. के. एस. शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.