वादग्रस्त समांतर जलवाहिनीला अमेरिकेतील संस्था पुरस्कार देते आणि तो घेण्यासाठी महापौर जाणार असल्याचे सांगितले जाते. हा प्रकार अनाकलनीय असून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळणारा असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली. हा पुरस्कार महापौरांनी नाकारावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जी योजना फक्त कागदावर आहे व ठेकेदार काम करणार की नाही, हेच माहीत नाही. योजना पूर्ण होणार की मध्येच बंद पडणार याविषयी संभ्रम आहे. समांतरची योजना ३०० कोटींवरून १३०० कोटींपर्यंत गेली, पण काम सुरू झाले नाही. कागदावरील अशा योजनेला पुरस्कार का मिळतो? हा पुरस्कार म्हणजे निबंधाला पुरस्कार दिल्यासारखे आहे. त्यामुळे पुरस्कार स्वीकारण्यात आनंद कसला, असा सवाल करून मनसेने हा पुरस्कार महापौरांनी स्वीकारू नये, असे म्हटले आहे.
अमेरिकेत महापौरांचे जावई आणि मुले असतील तर त्यांनी खुशाल त्यांना जाऊन भेटावे. मात्र, पुरस्कार घेतलाच तर पुन्हा भारतात आल्यावर मनसे काळे झेंडे दाखवून आंदोलन करेल. हा पुरस्कार स्वीकारणे म्हणजे औरंगाबादच्या नागरिकांचा अवमान असल्याची टीका मनसे शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, अरविंद धीवर, डॉ. शिवाजी कान्हेरे यांनी केली.