पांरपरिक शेतीच्या जोखडातून मुक्त व्हायला शेतकऱ्यांची मानसिकता आता तयार झाली असून त्यांना खर्च व उत्पन्नाचे गणित जमायला लागले आहे. औषध वनस्पतींच्या लागवडीमुळे न परवडणारी शेती ही फायद्याची शेती म्हणून निश्चित समोर येणार आहे. राष्ट्रीय कृषी वसंत प्रदर्शनात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या औषध वनस्पतींच्या जिवंत रोपांचे सादरीकरण करण्यात आले. या ठिकाणी शेतकऱ्यांची अलोट गर्दी होती. नवीन पीक पद्धत असल्यामुळे राज्यातील नव्हे, तर राज्याबाहेरील शेतकरी येथे मोठय़ा जिज्ञासेने माहिती घेत होते.
येथे त्रिदोषशामक, रक्तशोधक व त्वचा व्याधींपासून मुक्ती मिळवण्यासाठी रामबाण असणारे अनंतमूल, मुखशुद्धी व सर्पदंशावर संजीवनी ठरणारे गुंज, जीर्ण विषमज्वरावर चालणारे गुळवेल, उदरशूलवर चालणारे धोत्रा, मस्तिष्क विकृतीवर रामबाण ठरणारे ब्राम्ही या औषध वनस्पतींची रोपे होते. त्याचप्रमाणे केशवर्धक भृंगराज, बवासिरवर चालणारे चित्रक, ईसबगोल गहू, दुग्धजन्य पदार्थामध्ये उपयोगात येणारे शेंदूर, कफ व खोकल्यावर संजीवनी ठरणारे सब्जा, स्त्रीरोगावर प्रभावकारी ठरणारे चंद्रसूर, सर्वपरिचित असणारी शतावरी, पामारोझा, जपानी पुदीना आदी औषध वनस्पतींची रोपेही येथे होते. कुतूहलाने शेतकरी या वनस्पतींची चौकशी करत असून बियाणे व रोपांच्या उपलब्धतेविषयी विचारणा करीत होते.
परसबागेच्या स्वरूपात शेतामध्ये औषध वनस्पतींची शेती केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. अन्य पिकांसोबत शेतकऱ्यांनी शेतात १० ते २० गुंठय़ापर्यंत या वनस्पतींची लागवड करावी. आयुर्वेदिक कंपन्यांकडून मोठय़ा प्रमाणावर औषध वनस्पतींची मागणी होत आहे. त्यामुळे या शेतीला उज्ज्वल भविष्य आहे. औषध वनस्पतींच्या जिवंत रोपांच्या सादरीकरणाद्वारे औषध वनस्पतींपासून केवळ व्यापारी शेतीच केली जाऊ शकते असे नाही, तर आजार व विकारांवर घरचा वैद्यची भूमिकाही शेतकऱ्याला निभवता येते.
कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, उडीद किंवा मूग या पिकांची शेती आपणाला माहिती आहे. जास्त खर्च व उत्पन्न कमी या व्यस्त प्रमाणामुळे ही शेती ‘नको रे बाबा’ म्हणणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी नाही. या पारंपरिक पिकांच्या लागवडीमुळे शेतीचा खर्च व उत्पन्न यांचे गणित जुळत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीला पर्याय देणे गरजेचे आहे. शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचे, पीक पद्धतीचे वारे वाहत आहे. परिणामी, पारंपरिक शेतीला पर्याय उपलब्ध झाला आहे, त्यापकी औषध वनस्पती शेतीचा पर्यायही महत्त्वाचा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2014 रोजी प्रकाशित
राष्ट्रीय कृषी वसंत प्रदर्शनात औषध वनस्पतींचे सादरीकरण
पांरपरिक शेतीच्या जोखडातून मुक्त व्हायला शेतकऱ्यांची मानसिकता आता तयार झाली असून त्यांना खर्च व उत्पन्नाचे गणित जमायला लागले आहे.
First published on: 14-02-2014 at 07:20 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medicinal plant exhibition in krishi vasant