राज्यपालांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेल्या पाच आमदारांसह काँग्रेसच्या विदर्भातील आमदारांची बैठक रविवारी नागपुरात होणार आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत अल्पमतातील देवेंद्र फडणवीस सरकारविरोधात रणनीती आखण्यात येणार आहे. विदर्भातील धान, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करून सरकारला अडचणीत आणण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांचा मोर्चा विधानभवनावर नेण्याची व्यूहरचना केली जाणार आहे.
फडणवीस सरकारने भांबावून काँग्रेसच्या आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. सभागृहात तसेच कायदेशीर लढा सरकारविरोधात देण्याबद्दलदेखील यावेळी चर्चा केली जाणार आहे. भाजपच्या अल्पमतातील सरकाराला काय करावे हे सूचेनासे झाले आणि तरांबळ उडली. गोंधळात असलेल्या या सरकारने काँग्रेस आमदरांना निलंबित केले. काँग्रेस आमदरांवरील कारवाईचा विरोध आणि विश्वासदर्शक ठराव संमत करून घेण्याचे असंवैधानिक कृत्य या विरोधात रणनीती आखण्यासाठी काँग्रेसचे विदर्भातील आमदार आणि निलंबित आमदारांची बैठक प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी बोलावली आहे. मात्र बैठकीला काँग्रेसचे विधिमंडळ नेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार नाहीत.
निलंबित आमदार राहुल बोंद्रे, अमर काळे, अब्दुल सत्तार, वीरेंद्र जगताप आणि जयकुमार गोरे यांच्यासह विदर्भातील काँग्रेसचे आमदार बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विदर्भातील भात उत्पादक शेतकऱ्यांची अंत्यत वाईट अवस्था आहे. सरासरी केवळ ३० टक्के उत्पन्न झाले आहे. सोयाबिनचे उत्पादनदेखील अध्र्यावर आले आहे. कापूसचे दर कोसळले आहेत. विदर्भातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडला आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी शेतमालास भाव द्या, नाही तर सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तेव्हा सरकारने धान, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी १५ हजार रुपये अर्थसहाय्यकरावे, असे आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meeting of suspended mla of maharashtra assembly in vidarbha
First published on: 21-11-2014 at 01:03 IST