आखाडा बाळापूरच्या पाणीपुरवठय़ावर २० सप्टेंबर रोजी शिखर समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. कळमनुरी तालुक्यातील २५ गावे मोरवाडी योजनेतून होणारा पाणीपुरवठा विद्युत देयक थकल्याने बंद होता. वीज तोडल्याने आखाडा बाळापूरचे ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. या घटनेची पालकमंत्र्यांनी दखल घेतली आहे.
आखाडा बाळापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे ७० लाख ७१ हजार रुपये वीज देयक थकले आहे. चालू देयकाचे १ लाख ५३ हजार रुपयेही भरले गेले नाहीत. त्यामुळे वीजपुरवठा तोडण्यात आला. या विरोधात ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. या प्रश्नी तोडगा काढण्याच्या सूचना पालकमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिल्या आहेत. मोरवाडी योजनेंतर्गत २५ गावांना पाणीपुरवठा होतो. तेथील सरपंच आणि ग्रामसेवकांना सूचना देण्यात आल्या असून ग्रामसभा घेऊन पाणी योजनेतून पाणी हवे की नको, याबाबतचे प्रस्ताव नव्याने पाठवावे, असे जिल्हा परिषद प्रशासनाने कळविले आहे. या योजनेत समाविष्ट असणाऱ्या गावांच्या पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व सरपंचांची शिखर समिती स्थापन करण्यात आली असून, २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.