मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नावर नगर, नाशिक व औरंगाबाद जिल्हय़ांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक बोलावून तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी हिंगोली जिल्हय़ात दिली.
वसमत येथे ३५व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात पवार यांनी पाणीप्रश्नी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, की पूर्वी पाणीप्रश्नावरून नगर व नाशिक जिल्हय़ांत वाद होत असे. आता हा वाद मराठवाडय़ात पोहोचला आहे. मराठवाडय़ात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे शेतीला पाणी मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे नगर, नाशिक, औरंगाबाद जिल्हय़ांतील पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची लवकरच एकत्रित बैठक बोलावून पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.