रेल्वे प्रवाशांच्या तुलनेत असलेल्या अपुऱ्या लोकल संख्येमुळे ठाणेपल्याडच्या सर्वच स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी मोठय़ा प्रमाणावर वाढू लागली आहे. गर्दी वाढू लागल्यामुळे ही स्थानके िहसक बनू लागली आहेत. अशा परिस्थितीत या स्थानकांमध्ये पुरेशी सुरक्षाव्यवस्था तैनात केली जावी, अशी मागणी एकीकडे वाढत असली तरी २० लाखांहून अधिक प्रवाशी संख्या असलेल्या या स्थानकांच्या सुरक्षाव्यवस्था जेमतेम ४१८ पोलिसांच्या खांद्यावर असल्याची माहिती पुढे येऊ लागली आहे.
अपुरा पोलीस कर्मचारी वर्ग, वाढणारी गर्दी यामुळे खिसेकापू, चोरटय़ांसाठी ही सर्व स्थानके कुरणे ठरू लागली आहेत. या सर्व स्थानकांसाठी तब्बल ५१६ पोलीस कर्मचारी भरती करण्याचा रेल्वे व्यवस्थापनाचा प्रस्ताव आहे. त्यासंबंधीच्या जागांना मंजुरीही आहे. तरीही लाल फितीच्या कारभारात ही सगळी भरती अडकून पडल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
लोकलमधील गर्दीमुळे संतप्त झालेले प्रवासी हाणामारीवर उतरल्याचे चित्र कळवा, मुंब्रा, दिव्यासारख्या स्थानकात सातत्याने दिसू लागले आहे. लोकलमध्ये चढण्यासाठी छोटे चाकू, सायकलची चेन आणि फायटरसारखी हत्यारे बाळगू लागले असून जागेच्या वादातून, लोकलमध्ये चढताना, चौथ्या सीटसाठी सहप्रवासी दुसऱ्यांना दुखापत करू लागले आहेत. दिवा, मुंब्रासारखी स्थानके दंगलखोर म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. तर दुसरीकडे लोकलमध्ये पाकिटमार, सोनसाखळी आणि मोबाइल चोरांचा वावर मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. या परिस्थितीवर नियंत्रण राखण्यासाठी रेल्वे पोलिसांच्या संख्येत वाढ होण्याची गरज असताना परिस्थिती नेमकी उलट आहे. मध्य रेल्वेच्या ठाण्यापासून दिवा आणि ठाणे – वाशी -नेरूळ – बेलापूर – पनवेल हार्बर मार्गावर ठाणे पोलिसांची १८९ पदे मंजूर आहेत. असे असताना ठाण्यात सध्या १६० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवाशांच्या सुरक्षेबरोबर कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकातील सुरक्षेची जबाबदारीसुद्धा याच पोलीस ठाण्यावर आहे. सोनसाखळी चोरी, मोबाइल चोरीचे प्रमाण या भागात आहे.
डोंबिवली स्थानकातील प्रवाशांची संख्या सुमारे सहा लाखांच्या आसपास असून येथील रेल्वे पोलीस ठाण्यात ७६ पोलीस कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असून केवळ ६७ पोलिसांची नेमणूक झाली आहे. तर कल्याण ते कसारा आणि कर्जतपर्यंतची हद्द असलेल्या कल्याण या अत्यंत संवेदनशील पोलीस ठाण्यात २५१ पदांची मंजुरी असली तरी केवळ १९१ पोलीस कर्मचारी सध्या येथे नेमणुकीवर हजर आहेत. कल्याण पोलिसांच्या हद्दीत सुमारे १४ हून अधिक स्थानके असून त्यांमध्ये तेथील सुरक्षेची जबाबदारी सुद्धा याच पोलीस ठाण्यावर आहे. पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक अशा अधिकाऱ्यांच्या नेमणुकासुद्धा झाल्या नसल्याचे चित्र आहे.

पोलिसांवर कामाचा जादा भार..
कमी मनुष्यबळ असताना प्रत्येक स्थानकात दोन पोलीस कर्मचारी कायम कार्यरत असून स्थानकातील कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच रेल्वे अपघातातील मृत्यूचा पंचनामा करणे, अपघातग्रस्त प्रवाशांना रुग्णालयात दाखल करणे, रेल्वे ट्रॅकवर पहारा देणे अशी कामे कमी मनुष्यबळ असताना पूर्ण करावी लागत असल्याने पोलिसांवर कामाचा ताण असतो. कल्याण पोलीस ठाण्यात ही परिस्थिती अधिक गंभीर आहे असे येथील अधिकाऱ्यांकडून कळते. रेल्वे पोलीसांच्या हद्दीमध्ये गंभीर गुन्हे घडत असताना अशा गुन्ह्य़ांच्या तपासासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने असे गंभीर गुन्हे नोंदवण्यासाठी रेल्वे पोलीस टाळाटाळ करण्याचा आरोप प्रवाशांकडून होत असतो. अनेक वेळा शहर पोलिसांकडे अशा तक्रारदारांना पाठवण्याचा मार्ग त्यामुळेच रेल्वे पोलीस अवलंबतात.