डिसेंबर महिन्यापासून बेपत्ता असलेले निखिल झवेरी (४८) अखेर मालवणी येथील एका आश्रमात सापडले आहेत. त्यांच्या नावावर सुमारे तेराशे कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. वैमनस्यामुळे त्यांनी आश्रमात राहण्याचा मार्ग निवडला होता.
निखिल झवेरी यांची नेपियन्सी रोड येथे एक शाळा होती. सध्या ती बंद असून इमारतीची अवस्थाही बिकट आहे. आर्थिक डबघाईमुळे त्यांच्या राहत्या घरालाही सील लावण्यात आले होते. त्यामुळे ते कांदिवलीत एका नातेवाईकाकडे राहात होते. डिसेंबरमध्ये अचानक ते घरातून बेपत्ता झाले होते. त्यांच्या नावाने असलेल्या अब्जावधींच्या मालमत्तेमुळे त्यांचे अपहरण झाले असावे, अशी भीती कुटुंबियांना वाटत होती. मुंबई गुन्हे शाखेकडेही या प्रकरणाची तक्रार दाखल होती. सहपोलीस आयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांनी या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त आनंद मंडय़ा यांच्याकडे सोपविला होता.
मंडय़ा यांनी याप्रकरणी शोधमोहीम हाती घेतली होती. त्यांच्या अपहरणाची शक्यता निकालात निघाल्याने इतर शक्यता पडताळून पाहिल्या. आर्थिक डबघाईमुळे ते वैफल्यग्रस्त होते. शिवाय त्यांना आजारही होता. त्यामुळे मुंबई आणि परिसरातील सर्व रुग्णालये, अनाथाश्रम पालथे घातले गेले. प्रत्येक पोलीस ठाण्यात झवेरी यांचा फोटो पाठवून शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. अखेर मालवणी येथील एका आश्रमास ते वास्तव्यास असल्याचे आढळून आले. झवेरी यांने शोधणे मोठे आव्हान होते. त्यांची आर्थिक पाश्र्वभूमी पाहता कसलीच शक्यता नाकारता येत नव्हती. पण आमच्या कर्मचाऱ्यांनी खोलवर जाऊन परिश्रम केल्याने झवेरी यांचा शोध लागू शकला, अशी प्रतिक्रिया मंडय़ा यांनी व्यक्त केली.