अकोला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकासाठी अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. मनसेनेही त्यात उडी घेतली असून आपले अस्तित्व दाखविण्यासाठी का होईना, पण त्यांनी निवडणुकीत भाग घेतला आहे. अकोला, अकोट व तेल्हारा या तीन तालुक्यासाठी उमेदवारांची यादी मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय मालोकार यांनी प्रसिद्ध केली आहे. यात ४९ नावे आहेत.
जिल्ह्य़ात मनसेचा प्रभाव तसा फारसा नाही, पण मनपात मनसेचा एक नगरसेवक निवडून आला आहे, हे जरी खरे असले तरी ती मनसेची नव्हे, तर उमेदवार राजेश काळे यांच्या कामाची,ओळखीची पुण्याई आहे. काळे हे प्रथम शिवसेनेचे होते, पण राज ठाकरे यांचा त्यांच्यावर प्रभाव असल्याने ते मनसेकडे वळले.
मनसेने जिल्ह्य़ात विविध आंदोलने राबविली, परंतु पदाधिकाऱ्यांमध्येच दुही व स्वत:चे महत्व वाढविण्याचा खेळ चालू असल्याने पक्षाचे काम एकदिलाने होत नाही, अशी पक्षजनांचीच खाजगीत तक्रार आहे.
 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या  निवडणुकीत त्यांना सर्व जागांसाठी उमेदवार मिळणे कठीण जात असल्याचे सांगण्यात आले आहे. तरीही आपल्या पक्षाचे अस्तित्व मनसेला यातून दाखवायचे आहे.