पदे घेऊन मिरविणा-या आणि पक्षकार्याकडे दुर्लक्ष करणा-या जिल्हय़ातील पदाधिका-यांची शुक्रवारी मनसेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख यशवंत किल्लेदार यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. मात्र पदाधिका-यांना नैतिकतेचे डोस पाजत असतानाच किल्लेदार यांच्या शेजारीच गुन्हेगारी प्रवृत्तीचे पदाधिकारी बसल्याचे पाहून कार्यकर्त्यांतून आश्चर्य व्यक्त होत होते.
मनसेचे नेते राज ठाकरे यांची पुणे येथील सभा, आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका या पार्श्र्वभूमीवर यशवंत किल्लेदार यांनी कोल्हापूर जिल्हय़ातील मनसेच्या पदाधिका-यांची बैठक घेतली. बंद खोलीत पदाधिका-यांशी त्यांनी चर्चाही केली. पदाधिका-यांनी जिल्हय़ातील वरिष्ठ पदाधिकारी, विविध ठिकाणचे शहरप्रमुख हे निष्क्रिय असल्याचे आणि पक्षसंघटनेऐवजी भलत्याच गोष्टीत रस घेत असल्याच्या उघड तक्रारी केल्या. वस्तुस्थितीची जाणीव झाल्याने किल्लेदार यांनी मार्गदर्शनपर भाषणात प्रमुख पदाधिका-यांची चांगलीच झाडाझडती घेतली. ते म्हणाले, पदे केवळ शोभेसाठी घेणा-यांना मनसेमध्ये स्थान नाही. काम करणार नसाल तर पक्षातून अर्धचंद्र देण्यात येईल. ही स्थिती येण्यापूर्वीच निष्क्रिय पदाधिका-यांनी सन्मानाने पद सोडावे, कार्यक्षम कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल, पदाधिका-यांनी आपल्या कामांचा अहवाल सादर करावा. त्याचा आढावा घेतल्यानंतर गच्छतीचा निर्णय घेतला जाईल.
राज ठाकरे यांनी पुणे येथे झालेल्या बैठकीत गट अध्यक्ष (पोलिंग एजंट) नियुक्तीचे काम रखडल्याबद्दल कोल्हापूर जिल्हय़ातील पदाधिका-यांची कानउघडणी केली होती. त्याचा संदर्भ घेऊन किल्लेदार यांनी गट अध्यक्ष निवडीचे काम गतीने व्हावे, अन्यथा अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून घरी बसविण्यात येईल, असा इशारा दिला. पुणे येथे होणा-या राज ठाकरेंच्या सभेसाठी जिल्हय़ातून तीन हजार कार्यकर्ते जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष अभिजित साळोखे, शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 8th Feb 2014 रोजी प्रकाशित
पक्षकार्याकडे दुर्लक्ष करणा-या पदाधिका-यांची संपर्कप्रमुखांकडून झाडाझडती
पदे घेऊन मिरविणा-या आणि पक्षकार्याकडे दुर्लक्ष करणा-या जिल्हय़ातील पदाधिका-यांची शुक्रवारी मनसेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख यशवंत किल्लेदार यांनी चांगलीच झाडाझडती घेतली.

First published on: 08-02-2014 at 03:25 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns district chief rebuking officers