दोन माकडांनी सध्या कळंबोली पोलीस ठाण्यासह शेजारच्या इमारतींमधील रहिवाशांचा जीव मेटाकुटीस आणला आहे. मागील पाच महिन्यांपासून हा उच्छाद सुरू असून या माकडांवर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही. रहिवाशांनी एका मदाऱ्याला या उच्छादी माकडांना पकडण्यासाठी पाचारण केले. मदाऱ्याने त्याच्याजवळील माकडासह या माकडांना काबीज करण्याचा प्रयत्न केला, पण तोही फसला.
कळंबोली पोलीस ठाण्याच्या इमारतीशेजारी शिवप्लाझा, आर्यप्रेम, सूर्यविहार, अमृतकुंज या सोसायटय़ांच्या इमारती आहेत. तसेच या सोसायटय़ांलगत कळंबोली गावाचा परिसर सुरू होतो. मागील पाच महिन्यांपासून या दोन माकडांनी पोलीस ठाण्याला आपला तळ बनविला आहे. झाडांवर राहणारी ही माकडे कधी, कोठून आली याची माहिती पोलिसांना नाही. मात्र या माकडांमुळे पोलीस ठाण्यावरील छतावर ठेवलेल्या कबाडीखान्याची जागा बदलण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. महत्त्वाचे दस्तावेज ठेवायला ठाण्याच्या इमारतीत जागा नसल्याने पोलिसांनी छतावर सभागृहाचे बांधकाम केले. सध्या येथे माकडांची दहशत आहे. पोलीस ठाण्याच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा मोकाट वावर असल्याने माकडे जमिनीवर उतरून फियार्दी व पोलिसांना त्रास देण्याची वेळ अजूनही आलेली नाही. मात्र या माकडांनी उंच झाडांवरील फांद्याच्या मदतीने इमारतींमध्ये शिरण्याचा प्रताप केला आहे.
 या माकडांच्या उपद्रवापासून रहिवाशांची सुटका व्हावी यासाठी कळंबोली गावचे किशोर खानावकर यांनी सायबू या मदाऱ्याला येथे बोलावले होते. सायबूने आपल्याजवळील माकडही तेथे आणले. त्यानंतर दोन तास उपद्रवी माकडांना पकडण्याचा खेळ सुरू झाला. सायबूसोबतच्या माकडाचे नाव रामू असे होते. रामूने या माकडांची टेहळणी केली. खाऊ देऊन मैत्री करण्याचा प्रयत्नही झाला. मात्र पोलीस ठाण्याच्या सहवासामुळे ही माकडे पाच महिन्यांत अतिशय तल्लख बुद्धीची झाली असल्याचा शेरा सायबू यांनी दिला व मोकळ्या हाताने तेथून सायबू परत गेला. याबाबत कळंबोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराम मोहिते म्हणाले, ही माकडे गेल्या पाच महिन्यांपासून येथे आली आहेत. या माकडांमुळे शेजारच्या रहिवाशांना त्रास होतोय, याबाबत कोणीही कधीही तक्रार घेऊन आमच्याकडे आले नाही. तसेच पोलीस ठाण्यातील कुत्र्यांच्या वावरामुळे ही माकडे खाली उतरत नाहीत. परंतु पोलिसांना या माकडांचा थेट त्रास नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात येते.
गृहिणींना धास्ती
किचन रूममधील टोमॅटो, बटाटे तसेच वाळविण्यासाठी दोरीला अडकविलेले कपडे ही माकडे पळवितात, यामुळे येथील गृहिणींना या माकडांची मोठी धास्ती लागली आहे. चुकून एखाद्या वेळी खिडकीचा दरवाजा उघडा ठेवला की माकडे घरात शिरत असल्याने या माकडांचे काही तरी करा, असे बोलण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे.