एम इंडिकेटरमध्ये येणार मोनो, मेट्रो, फेरीबोटींचे वेळापत्रक
मुंबईकरच नव्हे तर बाहेरून मुंबईत येणाऱ्यांसाठीही ‘वाटाडय़ा’चे काम करणारे ‘एम इंडिकेटर’ हे अ‍ॅप आता अद्ययावत होऊ घातले आहे. लोकल, बेस्ट यांच्या जोडीने आता नव्याने सुरू झालेल्या मोनो, मेट्रो तसेच काही फेरी बोटींचे वेळापत्रक आणि तिकीट दरही आता त्यावर पाहता येणार आहेत.
मुंबईतील सचिन टेके या तरूणाने विकसित केलेल्या ‘एम इंडिकेटर’चे नवे व्हर्जन लवकरच अ‍ॅप बाजारात उपलब्ध होत आहे. या अ‍ॅपमध्ये मोनो आणि मेट्रो या दोन नव्या वाहतूक सेवांचे वेळापत्रक आणि दरपत्रक मिळणार आहे. याशिवाय या दोन्ही सेवांचे नियमही त्यात असणार आहेत. मेट्रोतून प्रवास करत असताना काही तक्रार करावयाची असेल तर ती सुविधाही या अ‍ॅपमध्ये देण्यात आली आहे. ही तक्रार थेट मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडे पोहोचणार आहे. त्यासंदर्भात मेट्रो यंत्रणेशी समन्वय झाल्याचे सचिनने सांगितले.
फेरी बोटींचे वेळापत्रक
मुंबई तसेच उपनगरातून रोज विविध ठिकाणांहून फेरी बोटी सुटतात. पण त्यांच्या वेळा माहिती नसल्याने गोंधळ उडतो. अर्नाळा ते अर्नाळा किल्ला, नायगाव जेट्टी ते पाणजू बेट, मढ-मार्वे-गोराई ते एस्सल वर्ल्ड, गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा क्वेज, भाऊचा धक्का ते मांडवा-रेवस-उरण या फेरीबोट सेवांचे वेळापत्र आणि दरपत्रकही देण्यात येणार आहे.
पावसाचे अपडेट्सही मिळवा
सचिनने मुंबई महापालिकेच्या सहकार्याने या अ‍ॅपमध्ये पावसाचे अपडेट्स देण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. मुंबईत किती पाऊस पडला, भरती-ओहोटीच्या वेळा आदी माहितीही मिळणार आहे.
अ‍ॅपमधील अधिक सुधारणा
जुन्या व्हर्जनमधील सुविधाही नव्या व्हर्जनमध्ये अद्ययावत करण्यात आल्या आहेत. लोकल सेवेसाठी यापूर्वी देण्यात आलेल्या नकाशा आयआयटीच्या सहकार्याने अधिक अद्ययावत करण्यात आला आहे. या नकाशात प्रत्येक रेल्वे स्थानकाचा सांकेतिक शब्द तसेच मूळ स्थानकापासून तेथे पोहचण्यासाठी लागणारा वेळही देण्यात येणार आहे. एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी थेट बससेवा नसेल तर टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी कसे पोहोचावे, कुठे कोणत्या बस पकडायच्या, या प्रवासात किती थांबे आहेत आदी माहितीही मिळणार आहे. टॅक्सी थांब्यांचे क्रमांकही देण्यात आलेले आहेत.