पावसाळी प्रवासी तिकीट दरवाढ जाहीर
साध्या बोटीचे ५०, तर स्पीड बोटीचे ७५ रुपये तिकीट
मोरा ते मुंबईदरम्यान चालणाऱ्या जलवाहतुकीसाठी पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर या चार महिन्यांकरिता प्रवासी तिकीट दरवाढ करण्यात आली आहे. यावर्षी या मार्गावरील साध्या बोटींचे तिकीट दर ४५ रुपयांवरून ५० रुपये, तर नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्पीड बोटीचे तिकीट दर ५२ वरून ७५ रुपये करण्यात आले आहेत. सप्टेंबरनंतर पुन्हा जैसे थे दर करण्यात येतील, अशी माहिती बंदर विभागाने दिली आहे.
उरण ते मुंबईदरम्यान स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच जलवाहतूक सेवा सुरू आहे. या जलसेवेचे वैशिष्टय़ म्हणजे ही सेवा बारमाही सुरू असते. तर पावसामुळे समुद्राच्या वाढत्या लाटा, वादळीवारे यामुळे जलप्रवास धोकादायक असल्याने मुंबई ते अलिबाग दरम्यानची रेवस ते मुंबई तसेच मांडवा ते मुंबई या जलवाहतूक सेवा बंद असतात. परंतु उरण ते मुंबईदरम्यानची सेवा अतिधोकादायक स्थितीत असेल तेव्हाच ती बंद केली जाते. अलिबाग ते मुंबईदरम्यानचे प्रवासीही या मार्गाचा पावसाळ्यात प्रवास करतात. अलिबाग ते मुंबई तसेच उरण ते मुंबईदरम्यानच्या चाकरमान्यांचीही संख्या मोठी आहे. तसेच जलमार्ग हा प्रदूषणरहित तसेच कमी खर्चाचा असल्याने सध्या प्राधान्याने प्रवाशांकडून या मार्गाचा अवलंब केला जात आहे. त्यातच दोन महिन्यांपूवी मोरा ते मुंबईदरम्यान आर.एन.शिपिंग कंपनीकडून ५२ रुपयात अध्र्या तासात मुंबई गाठणाऱ्या जलद प्रवासासाठी स्पीड बोट सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी संख्येत अधिक वाढ झालेली आहे.
या दरवाढी संदर्भात मोरा बंदर विभागाचे अधिकारी नितीन कोळी यांच्याशी संपर्क साधला असता, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने पावसाळ्यात या दोन्ही जलवाहतूक सेवेच्या प्रवासी तिकीट दरवाढीला मंजुरी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.