निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडासह विविध प्रश्नांच्या मागण्यांसाठी सोमवारी सर्व श्रमिक संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय व प्रॉव्हिडंट फंड कार्यालय येथे मोर्चा काढून या कार्यालयासमोर निदर्शनेही करण्यात आली.
निवृत्त कर्मचाऱ्यांना ४ रूपयांपासून १९०० रूपयेपर्यंत अल्प निवृत्तिवेतन मिळत आहे. त्यांना महागाई भत्त्याचा लाभ होत नाही. त्यांना योग्य प्रमाणात प्रॉव्हिडंट फंड, महागाई भत्ता मिळावा, शासनआदेश होईपर्यंत १ हजार रूपयांची अंतरिम वाढ करावी, निवृत्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा द्यावात आदी मागण्यांसाठी ८ राज्यांमध्ये सोमवारी आंदोलन करण्यात आले.
कोल्हापुरात या मागणीसाठी सर्व श्रमिक संघाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. संघाच्या लक्ष्मीपुरी कार्यालयापासून सुरू झालेला मोर्चा प्रथम जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ केला. तेथे संघटनेचे अध्यक्ष कॉ.अतुल दिघे, बी.एन.काटकर,अप्पा कुलकर्णी, पी.एच.पाटील, शिवाजी दळवी, शांताराम पाटील, रामजी देसाई, कृष्णात चौगुले, बाजीराव पाटील, अप्पासाहेब बिडकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.निवासी उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांना पंतप्रधानांना देण्यासाठीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.यानंतर प्रॉव्हिडंट कार्यालयावर मोर्चा गेला. तेथील निवृत्त कर्मचारी विभागाचे अधिकारी ए.आर.कुलकर्णी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.