दहावीची परीक्षा उद्यापासून (शनिवार) सुरू होत आहे. औरंगाबाद विभागातून १ लाख ६४ हजार ७६९ विद्यार्थी परीक्षेस बसणार असून, ७ केंद्र उपद्रवी असल्याचे निरीक्षण औरंगाबाद विभागीय मंडळाने नोंदविले आहे. ५१२ केंद्रांवर होणाऱ्या परीक्षेसाठी ५८ परीरक्षकांची नियुक्ती केली आहे. परीक्षेसंबंधातील गोपनीय माहिती वगळता इतर सर्व माहितीसाठी हेल्पलाईन सुरू केली असून विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी व्हावा, म्हणून समुपदेशकांचीही नियुक्ती केली आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातील ६८६ शाळांमध्ये दहावीच्या परीक्षेसाठी ६० हजार २३० विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. बीड ३९ हजार ९९, परभणी २६ हजार ६, जालना २४ हजार ४२ व  हिंगोली १५ हजार ३९२ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
लातूर विभागांतर्गत १ लाखावर परीक्षार्थी
लातूर विभागांतर्गत १ हजार ६५० शाळांमधील १ लाख १२ हजार १२१ परीक्षार्थी ३४८ केंद्रांमधून दहावीची परीक्षा देणार असल्याची माहिती लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष दिलीप सहस्रबुद्धे यांनी दिली. दि. २५ मार्चपर्यंत ही परीक्षा होणार आहे. मंडळाच्या वतीने पाच पथक तैनात केली आहेत. त्यात तीन शिक्षणाधिकारी, एक डायट व एक महिलांचे पथक आहे. शिवाय उपसंचालक व सहसंचालक कार्यालयाचे स्वतंत्र पथक राहील. यंदाही विभागाकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथक लक्ष देणार आहे. कॉपीमुक्त अभियानाला गती मिळावी, या साठी गेल्या काही वर्षांपासून ही उपाययोजना केली जाते. यात प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात राहणार असून भरारी पथकही नियुक्त करण्यात आले आहे.