राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत राज्यात ८ जिल्ह्य़ांत राबविलेला पथदर्शी प्रकल्प अत्यंत यशस्वी झाला आहे. या योजनेंतर्गत राज्यातील २ कोटी ११ लाख २८ हजार २२७ कुटुंबांना लाभ होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिली. येत्या २१ नोव्हेंबरला राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या योजनेच्या पूर्वतयारीसाठी रविभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला राज्यमंत्री राजेंद्र मुळक, आरोग्य विभागाच्या सचिव मीता लोचन, वित्त सचिव श्रीकांत देशपांडे, विभागीय आयुक्त वेणूगोपाल रेड्डी, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये ९७१ प्रकारच्या शस्त्रक्रियांचा समावेश असून ३६ प्रकारच्या विशेष आजारावरचा उपचारही या योजनेमध्ये लाभार्थीना मिळू शकेल. राज्यातील जवळपास ९५ टक्के कुटुंबीयांना याचा लाभ होणार असून लाभार्थीना यात कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. राज्यातील शुभ्र शिधापत्रिका धारकांना वगळून इतरांना याचा लाभ घेता येईल, असे शेट्टी यावेळी म्हणाले. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळाला असून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष दक्षता पथक स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सुरेश शेट्टी यांच्याप्रमाणेच पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनीही या योजनेच्या लोकार्पण सोहळ्याच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला. राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत विभागीय आयुक्त रेड्डी, पोलीस आयुक्त के.के. पाठक, जिल्हाधिकारी सौरभ राव, सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे उपस्थित होते. या कार्यक्रमास सोनिया गांधी, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रामुख्याने येणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्वानी काळजी घ्यावी, असे आवाहन मोघे यांनी याप्रसंगी केले.