एक लिटर दुधामागे दुकानदाराने एखादा रुपया जास्त घेतल्याने काय फरक पडतो, असा ‘दिलदार’ विचार करणाऱ्यांमुळे मुंबईकरांच्या खिशातून दिवसाकाठी सुमारे एक कोटी रुपये ओरबाडले जातात, म्हणजे वर्षांला जव़ळपास ३५० कोटींचा मलिदा रुपयारुपयाच्या रूपाने गोळा होत असतो. आता ही छुपी पिळवणूक बंद होणार आहे. दुधाच्या पिशवीवर छापलेल्या किंमतीपेक्षा एक रुपयादेखील जादा आकारला, तर विक्रेत्याला आणि दूधविक्रीच्या साखळीतील सर्वानाच हजारोंच्या दंडाच्या रूपाने त्याची किंमत मोजावी लागणार आहे.
राज्याच्या वैधमापन विभागाचे प्रमुख संजय पांडे यांनी गेल्या आठवडय़ात घेतलेल्या एका निर्णयामुळे, वर्षांनुवर्षे ग्राहकांच्या खिशातून नाहक होणारी लुबाडणूक आता थांबणार आहे. मुंबईतील दूध विक्रेते पिशवीवर छापलेल्या किरकोळ किंमतीहून जादा किंमत आकारतात, अशा तक्रारी या खात्याकडे सातत्याने येत होत्या. मात्र त्याकडे फारसे लक्षच दिले गेले नाही. जादा किंमत आकारण्याचे हे प्रमाण लिटरमागे एक रुपयापासून पाच रुपयापर्यंत कितीही असल्याने, ग्राहकाच्या खिशातून राजरोस चाललेली ही लूट बंद करण्याचे संजय पांडे यांनी ठरविले, आणि किरकोळ दूध विक्रेते, दूध संस्थांचे प्रतिनिधी, वाहतूकदार, व संबंधितांची बैठक बोलावून जादा किंमत न आकारण्याची सज्जड तंबी दिली.
दुधाच्या पिशव्या शीतपेटीत ठेवाव्या लागत असल्याने त्याकरिता लागणाऱ्या विजेचा खर्च वसूल करण्यासाठी छापील किंमतीहून अधिक पैसे घेतले जात असल्याचा दावा किरकोळ विक्रेते ग्राहकांसमोर करतात, त्यामुळे ग्राहकदेखील नाईलाजाने हे पैसे मोजतो. वस्तुत पिशवीवरील छापील किंमतीत सर्व प्रकारचे आकार समाविष्ट असल्याने ग्राहकाच्या खिशात अशा तऱ्हेने हात घालण्याचा विक्रेत्यास अधिकार नाही, त्यामुळे छापील किंमतीपेक्षा एक पैसादेखील जादा आकारता येणार नाही, असे संजय पांडे यांनी या बैठकीत सर्वाना ठणकावले.
दुधाच्या धंद्यातून काळा पैसा कमावण्याची ही एक मोठी साखळीच असून एकदोन रुपयांच्या किरकोळ रकमेकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्राहकांमुळे कोटय़वधी रुपयांचा काळा पैसा या साखळीकडे जमा होत असतो, असे निदर्शनास आल्याने ही कारवाई आम्ही सुरू केली असून, छापील किंमतीपेक्षा जास्त पैसे घेणाऱ्या जवळपास ८० विक्रेत्यांवर गेल्या आठवडाभरात खटलेही दाखल केले आहेत, असे पांडे यांनी सांगितले. एकटय़ा मुंबईतच दिवसाकाठी ४० ते ५० लाख लिटर दुधाची विक्री होत असल्याने, या व्यवहारातून होणाऱ्या लुटीची सहज कल्पना येते.
आता ही लुबाडणूक थांबविण्यासाठी, दुधाच्या पिशवीवरील छापील किमतीसोबत, ‘शीतकरण व वाहतूक खर्चासहित’ असा उल्लेख करण्याच्या सक्त सूचना पांडे यांनी दिल्या आहेत. शिवाय, दूध वितरकांनीच या निर्णयाची माहिती जाहिरातीद्वारे द्यावी असा आदेशही पांडे यांनी दिला आहे. यापुढे जादा किंमत आकारणारा किरकोळ दूध विक्रेता सापडला, तरी वितरक आणि संबंधित डेअरीच्या अधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात येईल, असा इशाराच या बैठकीत पांडे यांनी दिल्याने, सफेद दुधातील काळेबेरे नष्ट होणार आहे..