तब्बल १३ स्पर्धामध्ये राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याचा मान मिळविण्याबरोबरच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी यंदाही ‘पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठीय युवा महोत्सवा’ची चॅम्पीयनशीप खिशात टाकली आहे.
संगीत, नाटय़, फाइन आर्ट, साहित्य आदी विविध गटांमध्ये झालेल्या २४ स्पर्धामध्ये सादरीकरण करत मुंबई विद्यापीठाने सर्वाधिक ७९ गुणांची कमाई या स्पर्धेत केली आहे. त्या खालोखाल राजस्थानच्या बनस्थळी विद्यापीठाने ६१ गुणांची कमाई करत दुसरा क्रमांक पटकावल्याची माहिती विद्यापीठाच्या ‘विद्यार्थी कल्याण विभागा’चे संचालक मृदुळ निळे यांनी सांगितले. या यशामुळे मुंबई विद्यापीठाला १८ ते २२ फेब्रुवारीला कुरुक्षेत्र येथे होणाऱ्या ‘राष्ट्रीय युवा महोत्सवा’तील सुमारे १३ स्पर्धामध्ये भाग घेण्याचा मान मिळाला आहे. महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश या राज्यांतील २३ विद्यापीठांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
विद्यापीठाच्या शास्त्रीय गायनात विद्यापीठाचा गंधार देशपांडे, सूरवाद्यात (सरोद) आदित्य आपटे, शास्त्रीय नृत्य स्पर्धेत निकिता बाणावलीकर या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पूजा देसाई, कविता शेटय़े, मयूरी नेवरेकर, रचित अगरवाल, ज्ञानेश्वरी चिंदरकर आणि तेजंदर सिंग या विद्यार्थ्यांनी भारतीय समूह गायनात दुसरा क्रमांक पटकावला. तर पूजा देसाई, सागर चव्हाण, प्रथमेश शिवलकर, निकिता बाणावलीकर, मंथन खांडके, मयूर साळवी या विद्यार्थ्यांनी सादर केलेली श्रुतिका दुसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकाची मानकरी ठरली. मूकनाटय़ अभिनयाचे पहिले पारितोषिकही विद्यापीठाने पटकावले आहे. हर्षद वैती, जय म्हामुणकर, मंथन खांडके, मयूर साळवी, महेश कोपरकर आणि प्रथमेश चिऊलकर यांनी हे मूकनाटय़ सादर केले होते.
याशिवाय प्रश्नमंजूषेत तरुण मेनन, वरुण सुरेश आणि दिलीप उन्नीकृष्णन या विद्यार्थ्यांच्या गटाने पहिला क्रमांक पटकावला. वादविवाद स्पर्धेतही वरुण सुरेश आणि तरुण मेनन यांनी विद्यापीठाला पहिला क्रमांकाचे मानकरी ठरविले. फाइन आर्टमधील ऑन दि स्पॉटमध्ये अभिषेक आचार्य, क्ले पेंटिंग आणि छायाचित्रणात प्रणीत पोळेकर आणि पोस्टर मेकिंगमध्ये शनी सोनावणे यांनी पहिला क्रमांक पटकावला तर व्यंगचित्र स्पर्धेत मनोहर गुंजाळ याने दुसरा क्रमांक खिशात टाकला.
विद्यार्थ्यांच्या या अव्वल कामगिरीमुळे फाइन आर्ट गटामध्ये विद्यापीठाला सर्वोच्च कामगिरी केल्याचा (ओव्हरऑल चॅम्पीयनशीप) मान मिळाला आहे. याशिवाय नाटक आणि प्रस्नमंजूषा या गटातील सर्वोच्च कामगिरीचा मानही विद्यापीठाला मिळाला आहे. या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक समन्वयक म्हणून दीपक पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.