‘बडी लंबी रात थी.. सोए तो सर्दीयोंका मौसम था, आँख खुली तो बरसात शुरू थी..’ मुंबईकरांची सकाळ उगवली ती व्हॉट्स अॅपवरील या संदेशानेच! सोमवारी रात्री गुलाबी थंडीच्या मोसमात दुलईत गुरफटून झोपी गेलेल्या मुंबईकरांना मंगळवारी पहाटे रिमझिम पावसानेच जाग आली. पहाटे उठून फिरायला जाणारे ‘स्वेटर घालावा की, रेनकोट’ या चिंतेत होते. दर दिवशी गव्हांकूर, बीट, गाजर यांचा रस विकणाऱ्यांच्या ठेल्यासमोरील गर्दी मंगळवारी चहाच्या टपरीवर जमली होती.
इतर दिवशी सकाळी फिरायला जाणाऱ्यांच्या गप्पांमध्ये राजकारण, रेल्वे प्रवासातील घटना, घरगुती कटकटी असे विषय असतात. मात्र मंगळवारी या सर्वच विषयांची जागा पौषातील पावसाने घेतली. हा पाऊस नेमका कसा पडला, याची वेगवेगळी कारणे गप्पांमधून ऐकू येत होती. सोमवारी सकाळपासूनच मुंबईसह संपूर्ण परिसरावर मळभ दाटले होते. त्यामुळे सोमवारीच पाऊस पडतो की काय, असेही काहींना वाटले होते. मात्र पावसाने मंगळवारचा मुहूर्त गाठला. पावसामुळे पदपथ आणि हिरवळही निसरडी झाली असल्याने, ‘अण्णा, आज जरा सांभाळून चाला’ यासारखी वाक्येही कानावर पडत होती.
सकाळी लवकर ऑफिसला जाण्यासाठी एकदम टापटीप तयार होऊन निघालेल्या लोकांच्या चेहऱ्यावर सखेद आश्चर्य प्रकटले होते. छत्री हाती नाही, चांगले कपडे आणि चकाकणारे बूट, अशा अवतारात बस स्टॉपवर भिजत उभे राहण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता. दोन दिवसांपूर्वी मुंबईत बर्फ पडल्याची जोरदार अफवा पसरली होती. तापमान आणखी कमी असते, तर खरोखरच पावसाऐवजी बर्फ पडला असता, असेही उद्गार ऐकू येत होते. रिमझिमता पाऊस पडत असला, तरी या पावसाने चांगलीच तारांबळ उडाली.
भिजत भिजत ‘स्कूल चलें हम’
सकाळच्या शाळेसाठी घराबाहेर पडलेल्या अनेक मुलांनाही या अवेळी आलेल्या पावसाचे आश्चर्य वाटत होते. पाऊस पडत असला, तरी रस्त्यात पाणी वगैरे साठले नसल्याने त्यांना फारशी मजा करता आली नाही. पण पावसाचा जोर जास्त नसल्याने या मुलांनी पावसात भिजायचा आनंद मात्र घेतला. या मुलांच्या आयांनी आपल्या परीने ‘अवेळी आलेल्या पावसात भिजू नका’, वगैरे मातृसुलभ दमदमाटी केली. पण मुलांनी मात्र पावसाचा पुरेपूर आनंद लुटला
भिगें आज इस मौसम में!
ठाणे परिसरात तर सकाळी साडेनऊ-दहा वाजेपर्यंत पाऊस रेंगाळत होता. त्यामुळे सकाळच्या वेळी महाविद्यालयांमध्ये अडकून पडलेल्या जोडप्यांनी एक-दोन तासिकांनंतर काढता पाय घेतला. ढगाळ वातावरण, भुरभुरता पाऊस, हवीहवीशी वाटणारी थंडी आणि हातात हात घेऊन बाजूला चालण्यासाठी जोडीदार, असा योग जुळून आल्याने ही मंडळी ठिकठिकाणी दिसत होती.
व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरही धोधो मेसेज
पाऊस पडायला लागल्यावर मुंबईकरांच्या मोबाइलवर आणि फेसबुक पेजवरही या अवेळी आलेल्या पावसाशी संबंधित अनेक मजेशीर मेसेज फिरायला लागले. त्यापैकी काही..
*इंद्रलोकात सर्व देवगण इंद्राला – इंद्र देव, काय हे, जानेवारीत पाऊस!!
इंद्र (मस्तीत) – आली लहर, केला कहर.. आली हौस, पाडला पाऊस
*सकाळी सकाळी देवाने ‘दबंग’ बघितला आणि खुशीत येऊन म्हणाला.. ‘आज ऐसा मौसम बनाएंगे की, कन्फ्युज हो जाओगे.. स्वेटर पहने या रेनकोट!!!’
*हा पाऊस नाही.. मुंबईने गेल्या अनेक वर्षांत खूप दु:ख, दहशत आणि गुन्हे सोसले आहेत.. त्यामुळेच आलोक नाथ मुंबईवर गंगाजल शिंपडून शहराला पवित्र करत आहे.
*क्या लंबी रात थी.. विंटर में सोए,
और मान्सूमें जागे..
*जून में कभी होली नहीं होती
मे में कभी दिवाली नहीं होती
कोई प्यार भरा दिल रोया होगा
वरना जानेवारी में कभी बारिश नहीं होती
*हमें क्या पता था, मौसम ऐसे रो पडेगा
हमनें तो बस अपनी सॅलरी स्लिप दिखाई थी आसमान को..