स्थायी समितीला अंधारात ठेवून सदरमधील डायग्नोस्टिक सेंटरच्या करारात प्रशासनाकडून परस्पर फेरबदल करण्यात आले आहे. स्थायी समितीचा अधिकारावर प्रशासनाकडून गदा आणण्याचा प्रकार असल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी केला.
गरजूंना कमी दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या पीपीपी तत्त्वावर डायग्नोस्टिक सेंटरच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यानुसार पाणी आणि वीज महापालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार होते. समितीने मंजुरी दिलेल्या कोणत्याही प्रस्तावात फेरबदल करायचा असल्याचा तसा प्रस्ताव पुन्हा स्थायी समितीपुढे आणावा लागतो. परंतु या प्रकरणात मंजुरी न घेताच परस्पर कंत्राटदाराशी चर्चा करण्यात आली. त्यामुळे विजेचे देयक त्यांनी स्वत: भरावे अशी अट घालण्यात आली. कंत्राटदाराने ही अट मंजूर केली, परंतु त्या बदल्यात त्याने रुग्णांना दिल्या जाणाऱ्या शुल्कात फेरबदल केला. हा प्रकार गांभीर्याने घेत स्थायी समितीने या विषयावर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.
हनुमाननगर झोन, सतरंजीपुरा व नेहरूनगर झोनच्या अंदाजपत्रकाला मंजुरी प्रदान करण्यात आली व त्यासाठी प्रस्ताव आणण्यात प्रशासनाने केलेल्या विलंबासाठीही समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सोनेगाव तलावातून अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी पाईपलाईन टाकण्याच्या कामाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. कळमना प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामासाठी ९४ लाखांच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली. टप्याटप्याने २५ लाख रुपये देण्यात येणार आहे. ई गव्र्हनन्स प्रणाली सर्व विभागापर्यंत पोहोचावी यासाठी ११९ संगणक व २५ स्कॅनर खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन निविदा मागविण्याच्या सूचना देण्यात आल्या.