मुख्यमंत्र्यांकडे मोठा भाऊ म्हणून आपल्या विविध समस्या मांडण्यासाठी आणि त्यासोबत पाहुणचारासाठ़ी आलेल्या शेतकऱ्यांना पोलीस दलाने त्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहचू न देता मोर्चास्थळी अडविण्यात आले. आधीच दु:खी असलेला शेतकरी गेल्या तीन दिवसांपासून पायी प्रवास करून मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आणि पाहुणचारासाठी आलेला असताना प्रशासनाने आणि सरकारमधील मंत्र्यांनी त्यांना पाण्यासाठी सुद्धा विचारू नये. कुठे गेली सरकारची संवेदनशीलता असा प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली.
शेतकऱ्यांप्रती कळवळा असल्याचे केवळ नाटक करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोठे भाऊ नसून सावत्र भाऊ आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी लहान भाऊ असलेल्या शेतकऱ्यांना चांगली वागणूक दिली नाही, अशी भावना व्यक्त करीत विदर्भातील विविध जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. विदर्भातील सोयाबीन, कपाशी व धान उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळाच्या स्थितीत मदतीची मागणी करण्यासाठी १२ डिसेंबरपासून सेवाग्राम ते नागपूर अशी पदयात्रा काढण्यात आली असून ही पदयात्रा सेलू, घोराड, महाबळा, केळझर, सेलडोह, आसोला, बुटीबोरी, मोहगाव, खापरी आणि वर्धामार्गे आज सकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार होती. मुख्यमंत्री मोठा भाऊ आहे. त्यामुळे लहान भाऊ असलेल्या शेतकऱ्यांचे दुख त्यांनी समजून घ्यावे, अशी विनंती करण्यासाठी हजारो शेतकरी वर्धामार्गे त्यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी निघाले असता त्यांना पोलीस दलाने त्यांच्या घरापर्यंत पोहचू न देता त्यांना अडविण्यात आले. एरवी उड्डाणपुलावरून कधीही मोर्चाला परवानगी दिली जात नाही. मात्र, मोर्चातील शेतकरी भरकटू नये, म्हणून पोलीस प्रशासनाने रहाटे कॉलनीपासून उड्डाणपुलावरून त्या सर्व शेतकऱ्यांना मोर्चास्थळी आणले.
निसर्गामुळे विदर्भ आणि मराठवाडय़ातील निर्माण झालेली नापिकी आणि कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी यंदा दुष्टचक्रात सापडला असल्यामुळे शेतकऱ्याला भरीव मदत अपेक्षित आहे. सोयाबीन व कापसाची हमी भावाहून अधिक किंमतीत खरेदी करावी, सोयाबीन बुडाल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत करणे अपेक्षित आहे. कृषी संजीवनी योजनेचा लाभ, सातबारा कोरा करणे, तसेच वर्धा, नागपूर आणि बुलढाणा या जिल्ह्य़ातील मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या रकमा परतीसाठी मदत करावी यासह इतर मागण्यांसाठी ही पदयात्रा काढण्यात आली होती. यात शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि विचारवंत चंद्रकात वानखेडे, किसान अधिकारी अभियान प्रवक्ते अविनाश काकडे यांच्यासह वर्धा, चंद्रपूर, वाशीम, वणी, यवतमाळ व नागपूर जिल्ह्य़ातील शेतकरी सहभागी झाले होते.
या संदर्भात शेतकरी नेते आणि विचारवंत चंद्रकात वानखेडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, मुख्यमंत्र्यांच्या घरी पाहुणचार हे निमित्त असले तरी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याची त्यांना सुवर्णसंधी आली होती आणि त्यांनी ती दवडली. मोठा भाऊ म्हणून त्यांच्याकडे बघत असताना त्यांनी सावत्र भावासारखी वागणूक दिली आहे, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, शासनाच्यावतीने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोर्चास्थळी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निघालेली शेतकऱ्यांची पदयात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाणार असल्यामुळे धरमपेठेतील त्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता आणि त्याचा फटका त्या परिसरात राहणाऱ्या लोकांना बसला.
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2014 रोजी प्रकाशित
कुठे गेली सरकारची संवेदनशीलता, शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांवर नाराजी
मुख्यमंत्र्यांकडे मोठा भाऊ म्हणून आपल्या विविध समस्या मांडण्यासाठी आणि त्यासोबत पाहुणचारासाठ़ी आलेल्या शेतकऱ्यांना पोलीस दलाने

First published on: 16-12-2014 at 07:21 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur vidarbh maharashtra news