बल्लारपूर ते मुंबई थेट रेल्वे सुरू करावी, अशी मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांच्याकडे केली. या मागणीबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रभू यांनी दिले आहे.
यावेळी मुनगंटीवार यांनी राज्यातील ६३ विधानसभा सदस्यांच्या स्वाक्षरीचे निवेदनही सादर केले. या मागणीसंदर्भातील आपली भूमिका रेल्वेमंत्र्यांकडे विशद करताना मुनगंटीवार म्हणाले, बल्लारपूर ते मुंबई थेट रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी प्रलंबित आहे. चंद्रपूर हा राज्यातील प्रमुख औद्योगिक जिल्हा आहे. बल्लारपूरला विशेष औद्योगिक महत्त्व आहे. देशविख्यात पेपर उद्योग, वेकोलिच्या कोळसा खाणी, यामुळे या शहरात देशातल्या विविध प्रांतातील लोक वास्तव्यास आहेत. छोटा भारत, अशी बल्लारपूरची ख्याती आहे. ते प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. बल्लारपूर-मुंबई थेट रेल्वे नसल्याने जिल्ह्य़ातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. ही रेल्वे गाडी सुरू झाल्यास चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासात मोलाची भर पडेल, असे या चर्चेदरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वेमंत्र्यांना सांगितले. ही गाडी सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रभू यांनी मुनगंटीवार यांना दिले.  सार्वजनिक बांधकाम व सहकार मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.