वेगवेगळ्या समस्यांचा येथील रेल्वे स्थानकास वेढा असून त्याचा प्रवाशांना फटका बसत आहे. या समस्या त्वरित दूर करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
महत्त्वाच्या एक-दोन गाडय़ा या स्थानकावर थांबतात. परंतु प्रवाशांना निवाऱ्यासाठी छत व गाडीला दर्शक फलक नसल्याने बऱ्याचदा गाडी थांबल्यानंतर प्रवाशांची डब्यात चढण्यासाठी धावपळ उडते. गाडी अत्यंत कमी वेळेसाठी थांबत असल्याने प्रवाशांना घाई करावी लागते. बहुतेक वेळा सामान हातात घेईपर्यंत रेल्वे गाडी सुटलेली असते. या स्थानकावर प्रवाशांसाठी छत उभारण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. या स्थानकात एकच छत असून प्रवासी संख्या जास्त असल्याने ते अपुरे पडते. रेल्वे स्थानकातील दूरध्वनी नेहमीच बंद असतो किंवा तो लागत नाही. कधी लागलाच तर कोणी उचलत नाही अशी अवस्था आहे. प्रवाशांच्या विश्रांतीसाठी असलेले प्रतीक्षालय तर कधी उघडतच नाही. प्रवाशांना हे प्रतीक्षालय कधी उघडेल याची प्रतीक्षा आहे. स्थानकात कोणती गाडी आली हे सांगण्याची कोणतीही व्यवस्था नाही. अशा अनेक समस्या प्रवाशांना भेडसावत असताना रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
या स्थानकासाठी अनेक वर्षे रेल्वे प्रशासनाशी भांडून कामायणी एक्स्प्रेसला थांबा मिळाला. असे असले तरी अजूनही नांदगावकरांसाठी गरजेच्या असलेल्या पुणे-भुसावळ एक्स्प्रेस, साकेत सुपर एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस आणि आठवडय़ातून मंगळवारी जाणारी खान्देश एक्स्प्रेस या गाडय़ांना थांबा देण्याची मागणी नांदगावकर करत आहेत. तिकीट विक्री नाही म्हणून कामायणी एक्स्प्रेसला थांबा मिळत नव्हता. परंतु प्रायोगिक तत्त्वावर थांबा दिल्यानंतर आर्थिक निकष मोडीत काढून भरपूर गल्ला रेल्वे प्रशासनास मिळाला. इतर गाडय़ांच्या बाबतीतही हाच निकष लावून त्यांना थांबा देण्यात यावा. शनिदेवाचे तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले नस्तनपूर नांदगावपासून जवळच असल्याने नांदगाव रेल्वे स्थानकास विशेष महत्त्व असून या स्थानकाचा विकास करण्याची मागणी रेल्वे सल्लागार समितीकडून करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2015 रोजी प्रकाशित
नांदगाव रेल्वे स्थानकास समस्यांचा वेढा
वेगवेगळ्या समस्यांचा येथील रेल्वे स्थानकास वेढा असून त्याचा प्रवाशांना फटका बसत आहे. या समस्या त्वरित दूर करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
First published on: 08-05-2015 at 08:11 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nandgaon railway station problems