इ.स.२०२० पर्यंत नाशिक ‘थॅलेसेमिया’मुक्त करण्याचा निर्धार येथील अर्पण थॅलेसेमिया सोसायटीच्या वतीने वर्धापनदिन, रक्तमित्र व रक्तसंघटक पुरस्कार प्रदान सोहळ्यात करण्यात आला.
महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित या कार्यक्रमास आ. अपूर्व हिरे, उद्योगपती जगदीश सपट, एस. एम. शहा, एच. बी. थोन्टेश, डॉ. शरदचंद्र पगारे, रवींद्र सपकाळ, सोसायटीचे अध्यक्ष नरेंद्र शहा आदी मान्यवर उपस्थित होते. थॅलेसेमिया आजाराची माहिती विश्वस्त डॉ. राजेंद्र कुलकर्णी यांनी दिली. डॉ. राजेश कुचेरिया यांनी प्रास्ताविकात १९९८ पासून थॅलेसेमिया रुग्णांसाठी अर्पण रक्तपेढी मोफत रक्तपुरवठा करत असल्याचे सांगितले. थॅलेसेमिया हा जन्मापासूनचा रक्तातील आजार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी ‘अर्पण वार्ता थॅलेसेमिया विशेषांक’चे प्रकाशन करण्यात आले. थॅलेसेमियाग्रस्त मुलांनी व पालकांनी नाटक सादर केले.
यावेळी थॅलेसेमिया रुग्णांचे पालक प्रवीण घरटे, आनंद गरूड यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन वर्षां उगावकर यांनी केले. आभार डॉ. अतुल जैन यांनी मानले. थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी रक्ताऐवजी काही पर्याय असू शकतो का यावर सध्या जगात संशोधन सुरू असल्याची माहिती सोसायटीचे उपाध्यक्ष राधाकिसन चांडक यांनी दिली. यावेळी रक्तदान आणि रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणाऱ्या महात्मा गांधी विद्यामंदिरचे समन्वयक अपूर्व हिरे, सपकाळ नॉलेज हबचे कार्यकारी संचालक रवींद्र सपकाळ, समृद्धी जीवन फाऊंडेशनचे महेश मोतेवार, प्रीमियम टुल्सचे श्याम केळुस्कर, कोल्हापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष श्याम नोतानी यांना उद्योजक जगदीश सपट यांच्या हस्ते रक्तमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.