राज्यात स्वाइन फ्लूचा वाढता धोका पाहता महापालिकेने स्वाईन फ्लू विरोधातील मोहीम पुन्हा एकदा जोमाने सुरू करण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत स्वाईन फ्लू सदृश्य ३६ रुग्ण आढळले असून त्यातील पाच रुग्ण स्वाईन फ्लूने बाधित आहेत. या पाश्र्वभूमीवर, महापौरांनी शहर परिसरातील रुग्णालयात स्वतंत्र कक्षासह आवश्यक औषधसाठा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले.
पावसाळाच्या सुरूवातीला काही अंशी जाणवलेला स्वाईन फ्लू पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. राज्यात स्वाइन फ्लू बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापौर अशोक मुर्तडक यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात एप्रिल २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या कालावधीत स्वाईन फ्लू आजाराची लक्षणे असणारे ३६ संशयित आढळले आहेत. त्यात पाच रुग्णांना स्वाइन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले. त्यात दोन महिला असून असून एक सातपूर तर दुसरी कामटवाडा परिसरातील आहे. उर्वरीत तीन रुग्ण येवला, निफाड आणि सिन्नर तालुक्यातील असल्याचे मुर्तडक यांनी सांगितले. पालिकेच्या सर्व रुग्णालयांत स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक टॅमी फ्लूचा मुबलक स्वरूपात औषधसाठा उपलब्ध करावा, रुग्णालयात बाह्य़ रुग्णांसाठी विशेष कक्षाची स्थापना करावी तसेच १० ठिकाणी स्क्रिनिंग सेंटर उभारण्यात यावे, असे निर्देश महापौरांनी दिले. आरोग्य विभागाने स्वाइन फ्लू विरोधात जनजागृती मोहीम राबवावी, फलकांच्या माध्यमातून प्रबोधन करावे, झोपडपट्टी परिसरात मास्क पुरविण्यात यावे, आजार फैलावणार नाही या दृष्टीने अत्यावश्यक उपायांसह विविध कार्यक्रम हाती घेण्यात यावे, खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लू सदृश्य आजाराने दाखल होणाऱ्या रुग्णांची माहिती पालिकेला देण्यात यावी आदी सूचना वैद्यकीय विभागाला देण्यात आल्या आहेत. बैठकीस पालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
इतर तापांमुळे पाच जणांचा मृत्यू
एप्रिल २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या कालावधीत जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्लू सदृश्य आजाराने ५१ रुग्ण दाखल झाले. त्यातील सहा रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. उर्वरित २८ जणांचा अहवाल निरंक आला. या आजाराने उपरोक्त कालावधीत रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मात्र निमोनिया, फ्लू आदी आजारांमुळे ५ रुग्णांचा मृत्यू झाला. फेब्रुवारीच्या सुरूवातीला दोन रुग्ण दाखल झाले आहेत. त्यांच्या तपासण्या झाल्या. मात्र अद्याप अहवाल आलेला नाही.
– डॉ. गजानन होले (निवासी वैद्यकीय अधिकारी)