नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य मार्गावरील वाहतूक बुधवारी मंदावली असताना मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी टोल विरोधी आंदोलन करत ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला. नाशिक जिल्ह्यात मुंबई-आग्रा तसेच नाशिक-पुणे मार्गावर आंदोलकांनी गनिमी काव्याने वाहतूक बंद पाडण्यासाठी अनोखी शक्कल लढविली. मार्गस्थ होणाऱ्या मालमोटारी व कंटेनर थांबवून त्यांची चावी काढून घेणे, या मोटारी रस्त्यात आडव्या तिडव्या उभ्या करणे, टायरमधील हवा सोडणे असे प्रकार घडले. परिणामी, या आंदोलकांना पकडताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. मनसेचे आ. वसंत गिते आणि आ. नितीन भोसले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनामुळे आणि महामार्गावर बंद पाडण्यात आलेल्या मालमोटारी बाजुला हटविताना पोलीस यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली.
राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या टोल विरोधी आंदोलनाचे पडसाद मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये तीव्र स्वरुपात उमटतील याची खात्री असल्याने शहर व ग्रामीण पोलीस यंत्रणा आधीच सतर्क झाली होती. या दिवशी कोणत्याही टोल नाक्याची तोडफोड होऊ नये म्हणून ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहर पोलिसांनी जवळपास ४०० पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नोटीस बजावली होती. या घडामोडीच्या पाश्र्वभूमीवर, बुधवारी नाशिकमध्ये आंदोलन कसे होणार याकडे सर्वाचे लक्ष होते. सकाळपासून पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी महामार्गावर ठिकठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शहरातून जाणारा महामार्ग रोखला जाऊ नये म्हणून तयारी केली गेली असली तरी मनसेने गनिमी कावा तंत्राचा बहुतांश ठिकाणी वापर केला. आंदोलनाच्या धसक्यामुळे अनेक वाहनधारकांनी मोटारी महामार्गाच्याकडेला थांबविणे पसंत केले. त्यामुळे रस्त्यालगत काही ठिकाणी मोटारींच्या रांगा लागल्या होत्या. शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावर आ. नितीन भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यासाठी राष्ट्रवादी भवन समोरची जागा निवडण्यात आली. सव्र्हिस रोड व परिसरात तैनात पोलिसांना या आंदोलनाची माहिती मिळाल्यावर ते पुलावर धडकले. आ. भोसले यांच्यासह ५० ते ६० जणांना अटक करून पंचवटी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शहराबाहेर जाऊन आंदोलन करू नये म्हणून शहराच्या पोलीस हद्दीलगत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात होता. तथापि, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणेला चकमा देत भलत्याच मार्गाने वाडिवऱ्हे गाठले. आ. वसंत गिते यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी तातडीने धाव घेऊन आंदोलकांना हटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आ. गिते व पोलीस अधिकाऱ्यांची शाब्दीक चकमकही उडाली. या ठिकाणी जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, सुजाता डेरे यांच्यासह इतर पदाधिकारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनी या सर्वाना अटक करून ग्रामीण पोलीस दलाच्या आडगाव मुख्यालयात आणले. नाशिक-पुणे रस्त्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको करून वाहतूक बंद पाडली. या मार्गावर काही वाहनांची हवा सोडून देण्यात आली. त्यामुळे मालमोटारी रस्त्यात अडकून पडल्या होत्या. या प्रमाणे मनमाड, चांदवड, दिंडोरी रोडवर आंदोलने झाली. विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावरील ताहराबाद येथील चौफुलीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको करून टोल नाके बंद करण्याची मागणी केली. वाहतूक बंद पाडण्याचा आंदोलकांचा प्रयत्न असला तरी महामार्गावर तिचे स्वरूप तुरळक असल्याने काही अपवाद वगळता कुठेही वाहनांच्या रांगा पहावयास मिळाल्या नाही. मालेगावजवळ टेहरे येथे ग्रामीण जिल्हाप्रमुख संदीप पाटील, शहराध्यक्ष गुलाब पगारे, श्रीराम सोनवणे आदींसह कार्यकर्त्यांनी रास्तारोकोचा प्रयत्न केला. पोलिसांनी २८ जणांना अटक करून नंतर सोडून दिले. जिल्ह्यात एकूण १६१ जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण पडवळ यांनी दिली. मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लगेच अटक होत असल्याने महामार्गावर आंदोलनाचा फारसा परिणाम होणार नाही असा पोलीस यंत्रणाचा अंदाज होता. मात्र, गनिमी कावा पध्दतीने झालेल्या आंदोलनाने तो फोल ठरला. मनसेचे काही कार्यकर्ते कार व तत्सम मोटारीतून महामार्गावर भ्रमंती करत होते. नाशिक ते घोटी रस्त्यावर त्यांनी कंटेनर, अवजड मालमोटारी थांबवून चालकांकडून किल्ल्या ताब्यात घेतल्या. या आंदोलकांना पकडण्यासाठी ग्रामीण पोलिसांना महामार्गावर गस्त घालावी लागली. धुळे शहरात या आंदोलनाचे तुरळक पडसात उमटले. शहराजवळून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्ग तसेच सूरत-नागपूर महामार्गावरील टोल नाक्यांवर मनसेचे तुरळक कार्यकर्ते रास्तारोको करण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी त्यांना लगेचच ताब्यात घेऊन आंदोलन हाणून पाडले. त्यामुळे सर्वच टोल नाक्यांवरील वसुलीचे काम सुरळीत सुरु होते. धुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर शिरपूर, नरडाणा, सोनगीर व लळींग येथे टोलनाके आहेत. या ठिकाणी सकाळपासून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनासाठी घराबाहेर पडणाऱ्या मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शिरपूर शहराजवळील सावळदे टोल नाक्यावरही मनसेच्या कार्यकर्त्यांंना रास्ता रोको करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. साक्री तालुक्यातील दहीवेल चौफुलीवर १२ ते १५ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. मनसेच्या या आंदोलनास आ. अनील गोटे यांच्या लोकसंग्रामने पाठिंबा जाहीर केला होता. जळगाव जिल्ह्यात भडगाव-चाळीसगाव रस्त्यावरील नगर-देवळा उड्डाण पुलाजवळ मनसेच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको केले. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी सर्व आंदोलकांना अटक केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
आंदोलकांची ‘शाळा’
महामार्गावरील वाहतूक बंद पाडण्यासाठी मनसे आंदोलकांनी अनोखी शक्कल लढविल्याने त्यांना पकडताना पोलीस यंत्रणेची दमछाक झाली. शहरात आंदोलनाची तीव्रता फारशी जाणवली नाही. बाहेरून येणाऱ्या चार चाकी वाहनधारकांनी आंदोलनाचा धसका घेतल्याने मुंबई आग्रा महामार्गाच्या कडेला वाहनांची रांगा लागल्या. पाथर्डी फाटा ते घोटी टोल नाका दरम्यान पाथर्डी फाटा, गरवारे, जकात नाका, वाडीवऱ्हे, विल्होळी, पाडळी येथे पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच मार्गात ठिकठिकाणी लोखंडी जाळ्या उभारण्यात आल्या. यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी महामार्गावर आपली वाहने जिथे जागा मिळेल, त्या ठिकाणी लावण्यास सुरूवात केली. त्यानंतर महामार्गावरून येणाऱ्या वाहन चालकांना थांबविणे, त्यांना धमकावून चावी काढून घेणे असे प्रकार सुरू होते. काहींनी स्वत:हून गाडी बाजुला लावली तर काहींना चावी काढल्यामुळे रस्त्याच्या मधोमध मालमोटार उभी करणे भाग पडले. वाहतुकीस अडथळा येऊ नये म्हणून पोलिसांनी क्रेन बोलावून या गाडय़ा कडेला घेण्यास सुरूवात केली. काही मोटारी पोलीस कर्मचाऱ्यांनी धक्का मारुन बाजुला काढल्या. उत्साहाच्या भरात गाडय़ांच्या चाव्या लंपास करत कार्यकर्त्यांनी पोबारा केला. पोलीस यंत्रणेने खबरदारीचा उपाय म्हणून आंदोलकांचे भ्रमणध्वनी जमा करून घेतले. तसेच गाडी महामार्गावर उभी करताच कार्यकर्त्यांंना ताब्यात घेण्यात आले.
मुंबई-आग्रा महामार्गावर मनसेच्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच कसरत झाली. महामार्गावरच कंटेनर आडवा करण्याचा प्रयत्न, गाडी बंद करून रस्त्यात सोडून देणे, मालमोटारींची चावी काढून ती महामार्गावर उभी ठेवण्यास भाग पाडणे असे प्रकार झाले. पोलिसांना बंद गाडी बाजुला करण्यासाठी धक्का मारावा लागला. तर गाडी बंद करून पळणाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी धावपळ करावी लागली. (छाया – मयूर बारगजे)
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2014 रोजी प्रकाशित
पोलिसांचा बंदोबस्त, पण मनसेच्या गनिमी काव्याने त्रस्त
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य मार्गावरील वाहतूक बुधवारी मंदावली असताना मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी टोल विरोधी आंदोलन करत ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला.
First published on: 13-02-2014 at 12:32 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik mns toll agitation