मोदी लाटेच्या भरभक्कम करिष्म्याने बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांनी राष्ट्रवादीच्या कृष्णराव इंगळे यांना चारही मुंडय़ा चित केले, असे चित्र वरवर दिसत असले तरी राष्ट्रवादीच्या जिल्ह्य़ातील वरिष्ठ नेत्यांनी कृष्णराव इंगळे यांना प्रत्यक्षात बळीचा बकरा बनविण्याचे पद्धतशीर व सुनियोजित राजकारण केल्याचे निकालावरून स्पष्ट दिसते.
वास्ताविक, या निवडणुकीच्या प्रारंभी प्रतापराव जाधवांबद्दल नकारात्मक लाट होती. गेल्या पाच वर्षांतील जाधव यांचे जेमतेम काम व अतिशय अत्यल्प  जनसंपर्कामुळे त्यांना निवडणूक जड जाईल, असेच चित्र होते. मात्र, संपूर्ण देशात व राज्यात अचानक निर्माण झालेली कॉंग्रेस आघाडीविरोधी लाट व मोदींचा महाकरिष्म्यामुळे चित्र झपाटय़ाने पालटण्यास सुरुवात झाली. असे असले तरी राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आलेल्या या जागेवर पक्षाने डॉ. राजेंद्र शिंगणे किंवा रेखाताई खेडेकर यांच्यासारखा तगडा उमेदवार दिल्यास लढत तुल्यबळ व निर्णायक होईल, अशी जनआकांक्षा निर्माण झाली होती. मात्र, जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीच्या सर्व दिग्गजांनी रेखाताई खेडेकरांना एकमुखी विरोध केला. असे करताना आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जबरदस्त खेळी खेळत कृष्णराव इंगळे यांना तिकीट देण्यास हरकत नाही, असा सूर लावला. खरे म्हणजे, त्यांना प्रतापराव जाधवांविरोधात यावेळी लढायचे नव्हते. एकीकडे पक्षनिष्ठा दाखविणे व दुसरीकडे प्रतापरावांशी ऋणानुबंध जोपासायचे, अशीही दुटप्पी चाल होती. यात ते यशस्वी ठरले. याला दुसरे कारणही असे की, जिल्ह्य़ातून मराठा विरुद्ध मराठेतर उमेदवार दिल्यास तो निवडून येऊ शकतो, असे चुकीचे समीकरण शरद पवारांना पटवून देण्यात आले. खरे तर, प्रतापरावांच्या तुलनेत कृष्णराव अतिशय कच्चे व नवखे उमेदवार होते. शरद पवार, अजित पवार, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यांच्यासमोर जाहीरसभेत पक्षनिष्ठेची आक्रमकता दाखवायची, प्रतापरावांना शिव्या शाप घालायचे आणि प्रत्यक्षात कुठलेही काम न करता प्रतापरावांना अप्रत्यक्ष सहकार्य करायचे, असाच काहीसा भाग होता. राष्ट्रवादीने काँग्रेसनेच काम न केल्याने केवळ काँग्रेस मतांच्या आधारावर कृष्णराव इंगळे निवडून येणे अशक्य होते. त्यामुळे त्यांचा वारू साडेतीन लाख मतांपुढे सरकला नाही. यात काँग्रेसची परंपरागत मते ३ लाखाची आहेत. नेत्यांच्या कर्तृत्वाच्या मतांची यात भर पडली नाही. मोदी लाटेने प्रतापरावांना १ लाखावर मतांची भर दिली. मात्र, प्रतापरावांना विजयी करण्यासाठीच कृष्णराव इंगळे यांना बळीचा बकरा बनविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. असे करणारे आगामी विधानसभेत बळीचा बकरा बनण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण, आता काँग्रेस, राष्ट्रवादी व कृष्णराव समर्थक उट्टे काढण्याच्या तयारीला लागणार आहेत.