राज्यातील तीव्र दुष्काळी परिस्थिती पाहता नेत्यांना हार-पुष्पगुच्छ न देता दुष्काळग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टमध्ये देणगी स्वरूपात रक्कम जमा करण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी मुंबईत केले आहे. तसा फलक मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर लावलेला असताना नुकतेच नियुक्त झालेले अकोल्याचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील मात्र हारतुरे स्वीकारण्यात व सत्कार समारंभातच व्यस्त असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादीची दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्षपदाची माळ श्रीकांत पिसे पाटील यांच्या गळ्यात पडली. सहकार क्षेत्रातील दिग्गज नेत्यांना यामुळे धक्का बसला. या नियुक्तीनंतर मुंबई येथून श्रीकांत पिसे पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता जाहीर सत्कार व हारतुरे आणू नका, असे आवाहन केले होते, पण अकोल्यात येत्याच त्यांनी सत्काराला नकार न देता तो स्वीकारण्याचा सपाटा सुरू केला. जिल्हाध्यक्षांनी सत्कार स्वीकारण्यास प्रत्यक्षात नकार न दिल्याने राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते व नेत्यांनी त्याचा हारतुऱ्यांसह सत्कार केला. पुष्पगुच्छ भेट देत हार घालून त्यांचा सत्कार व स्वागत येथे गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्कार करण्यात व्यस्त असताना काही सरकारी अधिकाऱ्यांनीही राष्ट्रवादीच्या नेत्याचा सत्कार करण्याचा मोह आवारला नाही. त्यांनीही पुष्पहार घालून श्रीकांत पिसे यांचा नुकताच सत्कार केला. शासकीय कर्मचारी सत्कार करून थांबले नाहीत त्यांनी प्रसिध्दी माध्यमांना हे छायाचित्र देऊन स्वतची व श्रीकांत पिसे यांची मैत्री जगजाहीर केली. या माध्यमातून संबंधित सरकारी कर्मचाऱ्याने दबावाचे राजकारण सुरू केल्याची माहिती मिळाली.
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी दुष्काळी परिस्थिती पाहता हारतुरे न स्वीकारण्याचे केलेले आवाहन मुंबईत केले आहे. त्यामुळे ते दुष्काळी परिस्थिती नसलेल्या अकोल्यात लागू होत नाही, असे काय ते चित्र येथे निर्माण केले जात आहे, पण या सर्व गोष्टींमुळे राष्ट्रवादीचा व प्रदेशाध्यक्षांचा आदेश बासनात गुंडाळण्यात आल्याचे वास्तव समोर आले. दरम्यान, याविषयी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे यांच्याशी संपर्क केला असता तो झाला नाही.