प्राणी, पर्यावरण रक्षण व संवर्धनेसाठी गोमांस निर्यात व गोवंश हत्याबंदी कायदा पारित करावा लागेल. त्यासाठी विज्ञान, भारतीय संस्कृती, राजमुद्रेतील बैलाचे चित्र या मुद्यांच्या आधारे न्यायालयीन लढा देण्यासाठी तसेच शासनावर दबाव आणण्यासाठी अहिंसात्मक आंदोलन उभारावे लागेल, अशा शब्दात प्राणिमित्र व मांसाहरीप्रेमींच्या बैठकीत विचारमंथन झाले.
प्राणी, पर्यावरण रक्षा व संवर्धन महासंघाची स्थापना सोलापुरात नुकतीच करण्यात आली. त्यानिमित्ताने रुपाभवानी मंदिर परिसरात आयोजित बैठकीत नागणसूरचे मठाधीश श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी, श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक (कर्नाटक), संजय गोडसे-पाटील (लातूर), रुद्रप्पा बिराजदार (दक्षिण सोलापूर) आदींनी मार्गदर्शन केले. तुळजापूर तालुक्यातील सांगवी येथील श्रीदेवी माताजी या अध्यक्षस्थानी होत्या.
यावेळी प्रमोद मुतालिक यांनी गोवंश हत्याबंदीसाठी आता केवळ कायद्याच्या अंमलबजावणीवर विसंबून न राहता समाजजागृतीतून लढा उभारणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या बैठकीस माजी महापौर नलिनी चंदेले, जैन ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष चंदूभाई देढिया, प्राणी रक्षा व शाकाहार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष छगनलाल कवाड, गोरक्षनाथ भांगे, प्रा. उमा बिराजदार, अॅड. के. जी.कापसे, सुरेश कापसे, निवृत्त शिक्षक उस्मान शेख गुरुजी (लातूर) आदींची उपस्थिती होती. प्राणिमित्र विलास शहा यांनी आभार मानले.