चंद्रपूर जि.प.अर्थसंकल्प
जिल्हा परिषदेने जनतेच्या विकासाला प्राधान्य देणे क्रमप्राप्त असताना अर्थ सभापती गुणवंत कारेकार यांनी सोमवार, २५ मार्च रोजी सादर केलेल्या २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात अत्यावश्यक सुविधांना डावलून बांधकाम क्षेत्रासाठी भरीव निधीची तरतूद केली.
आरोग्य, कृषी विभागासाठी, तसेच चष्मे वितरण कार्यक्रमासाठी गतवर्षीच्या तुलनेत अत्यल्प निधी देण्यात आला असून शिक्षण विभागासाठी तरतूदच करण्यात आली नसल्याचा आरोप डॉ. सतीश वारजूरकर यांनी केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुंभरे यांच्या अध्यक्षतेखाली मा.सा.कन्नमवार सभागृहात दुपारी १ वाजताच्या सुमारास विशेष सभेला सुरुवात झाली त्यावेळी उपाध्यक्ष संदीप गड्डमवार, गुणवंत कारेकार, समाजकल्याण सभापती अरुण निमजे, महिला व बालकल्याण सभापती अमृता सूर, मुख्य कार्यपालन अधिकारी सी.एस.डहाळकर, उपमुख्य कार्यपालन अधिकारी सुनील निमक आदी उपस्थित होते. कारेकर यांनी १७ कोटी ९६ लाख ३९ हजार रुपयांच्या अर्थसंकल्पात १७ कोटी ८० लाख ६३ हजार रुपयांचा खर्च निर्धारित करण्यात आला असून, १५ लाख ७६ हजार रुपये शिल्लक दाखवण्यात आले आहेत. मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजना राबवण्यासाठी २०१२-१३ च्या सुधारित अंदाजपत्रकात १ कोटी ५५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, २०१३-१४ च्या मूळ अंदाजपत्रकात १ कोटी ११ लाख ५५ हजारांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेतून शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, कृषी व समाजकल्याण विभागांतर्गत योजनांचा समावेश आहे.
महिला व बालकल्याण विभागासाठी ५५ लाख ८८ हजार रुपये, तर आरोग्य अभियांत्रिकी हातपंप देखभाल व दुरुस्तीकरिता निधी कमी असल्याचे कारण पुढे करून कमी तरतूद करण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पात रस्ते, विकासात्मक कामे, गरजूंना चष्मे वाटप, प्राथमिक आरोग्य केंद्रावर नेबुलायझर वाटप, महिला व मुलींकरिता विकासात्मक योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप, संरक्षणासाठी मुलींना ज्युदो कराटे व योगा प्रशिक्षण, कृषी उत्पादन वाढीवर भर, सिंचन वाढीसाठी तरतूद, समाजकल्याण विभागांतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीपयोगी साहित्य पुरवणे, मच्छीमार संस्थांना जाळे वाटप व वसंत भवन वातानुकूलित करणे, फर्निचर खरेदी, रंगरंगोटी, देखभाल या नवीन योजना राबवण्यावर भर देण्यात आला आहे.
जिल्ह्य़ातील सर्व पंचायत समिती सभापतींनी विशेष सभेसाठी पाचारण करण्यात आले होते, परंतु सभा सुरू झाल्यानंतर काही वेळात जिल्हा परिषद सदस्यांनी पं.स. सभापतींना अधिकार नसल्याचे वक्तव्य केले.
यामुळे नागभीड व सिंदेवाही पंचायत समितीचे सभापती खोजराम मरसकोल्हे व अरविंद जैस्वाल यांनी नाराजी व्यक्त करून सभेवर बहिष्कार टाकून सभात्याग केला.