मुंबई आणि उरणला जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर जोडरस्त्याला ‘जायका’कडून ८० टक्के निधी कर्जरूपात मिळण्याची शक्यता असताना आता सिडको आणि मध्य रेल्वे यांनीही नेरूळ-उरण रेल्वेमार्गाचे काम दणक्यात सुरू केले आहे. या कामासाठी या दोन्ही संस्थांकडून अंदाजे १८०० कोटींचा खर्च होणार असून त्यापैकी ३८० कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नजिकच्या भविष्यात मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते उरण अशी उपनगरी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांत उरण येथील लोकवस्ती वाढली असून येथून दर दिवशी हजारो लोक मुंबईत कामासाठी येतात. हे प्रवासी दादर किंवा पनवेलपर्यंत एसटीने प्रवास करतात. या मार्गावर रेल्वेसेवा सुरू करावी, ही खूप जुनी मागणी आता कागदावरून प्रत्यक्षात उतरणार आहे. मध्य रेल्वे आणि सिडको या दोन संस्था एकत्रितपणे हा प्रकल्प उभारत आहेत. १८०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पातील दोन तृतियांश वाटा सिडको उचलणार आहे. तर एक तृतियांश खर्च मध्य रेल्वे उचलणार आहे. या १८०० कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चात गाडीच्या डब्यांचा खर्चही गृहित धरला आहे.
या प्रकल्पातील रेल्वेमार्ग उभारणीचे काम मध्य रेल्वेतर्फे करण्यात येणार आहे. तर स्थानकांची उभारणी सिडको करणार आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत ३८० कोटी रुपये खर्च झाला असून त्यापैकी १७५ कोटी रुपये खर्च मध्य रेल्वेतर्फे करण्यात आला आहे. तर उर्वरित २०५ कोटी रुपये सिडकोने खर्च केले आहेत. सध्या मध्य रेल्वेने जमीन सपाटीकरण आणि पुलांचे काम सुरू केले आहे. रेल्वेच्या ताब्यातील तब्बल ४० टक्के काम पूर्ण झाल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
६० किलोमीटर लांबीच्या या मार्गावर नेरूळ आणि उरण मिळून एकूण दहा स्थानके आहेत. नेरूळ, किले, तारघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी आणि उरण असा हा मार्ग तयार होणार आहे. या मार्गावरील खारकोपर स्थानकापुढील जमीन संपादन करण्याचे काम सध्या सिडकोतर्फे करण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Aug 2014 रोजी प्रकाशित
आता सीएसटी-उरण लोकल!
मुंबई आणि उरणला जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर जोडरस्त्याला ‘जायका’कडून ८० टक्के निधी कर्जरूपात मिळण्याची शक्यता असताना आता सिडको आणि मध्य रेल्वे यांनीही नेरूळ-उरण रेल्वेमार्गाचे काम दणक्यात सुरू केले आहे.
First published on: 02-08-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New cst uran local train announced