नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांची सहनशक्ती आता संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागताच सिडकोने तीन एफएसआय मंजूर करून रहिवाशांच्या भावनाशी खेळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. इतकाच एफएसआय द्यायचा होता तर इतकी वर्षे लोकांचा इतका अंत का पाहिला? रहिवाशांनी सर्व पैसे भरून घरे खरेदी केलेली असताना आता सिडकोचा या घरांवर हक्कच काय? असाच अधिकार खासगी बिल्डरांना देता येईल का? एकीकडे सरकार सदनिका धारकांना घरासकट जमिनीचा अधिकार देण्याचा प्रयत्न करीत असताना सिडको रहिवाशांच्या घरात कसा काय हिस्सा मागू शकते? अडीच एफएसआयमुळे वाढलेल्या लोकसंख्येला सामावून घेणारा अहवाल असताना तीन एफएसआयची लोकसंख्या कशी काय सामावून घेतली जाईल? घरांचा प्रश्न सुटत असताना त्याला खो घालण्याचा अधिकार सिडकोला कोणी दिला असे अनेक प्रश्न वाशी येथील जेएनवन व जेएनटु इमारतीतील रहिवाशांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे यानंतर आमच्या घरांबाबत सिडकोचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराच जणू काही या रहिवाशांनी दिला आहे.
नवी मुंबईत गेली अनेक वर्षे वाढीव एफएसआयचा प्रश्न ऐरणीवर आहे. तो सुटण्याच्या उंबरठय़ावर असतानाच सिडकोने बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींना तीन एफएसआय देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यापूर्वी याच सिडकोने अडीच एफएसआयला विरोध करीत दोन एफएसआय देण्यात यावा असे मत पालिकेने घेतलेल्या हरकतीच्या वेळी नोंदविलेले आहे. त्यामुळे सिडकोला अचानक तीन एफएसआयचा का पुळका आला असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे. वास्तविक अडीचऐवजी तीन एफएसआय मिळाल्यानंतर मोडकळीस आलेल्या इमारतीच्या रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरायला हवे होते, पण त्याऐवजी येथील रहिवाशांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली आहे. नवी मुंबई पालिकेने या इमारतींसाठी अडीच एफएसआय प्रस्तावित केला आहे. त्याला खो घालण्यासाठी सिडकोने तीन एफएसआय मंजूर करून शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकाच शहरात एकाच प्रकारच्या इमारतींना दोन प्रकारचा एफएसआय प्रस्तावित केला गेला आहे. त्यामुळे नगरविकास विभागाला वेळकाढूपणा करण्यासाठी हे कारण पुरेसे आहे. अडीच एफएसआयचा दुधात हा तीन एफएसआयच्या मिठाचा खडा पडला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींना वाढीव एफएसआय देण्याचा प्रश्न लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. येथील रहिवाशांना क्लस्टर डेव्हलपमेट अंर्तगत वाढणाऱ्या एफएसआयमध्ये रस नाही. या रहिवाशांना स्वतंत्र एफएसआय हवा आहे. सिडकोने तो देताना तीन पैकी रहिवाशांसाठी दीड एफएसआय देण्यात येईल असे जाहीर केले आहे. या घरांची पुनर्बाधणी करणाऱ्या बिल्डरला त्याचा खर्च आणि नफा काढण्यासाठी शिल्लक दीड एफएसआयमधील काही भाग देण्यात येणार असून त्यातील बाकी एफएसआयमध्ये सिडको गरिबांसाठी घरे बांधणार आहे. त्यामुळे आईजीच्या जोरावर बायची उदार अशी सिडकोची भूमिका आहे. सिडकोने नवी मुंबईतील इंचन्इंच जमीन लीजवर दिली आहे. त्यामुळे सिडको आजही या घरांचा मालक म्हणून मिरवतो. त्यामुळे हा हिस्सा हवा आहे. भविष्यात संपूर्ण शहरातील इमारतींची पुनर्बाधणी झाल्यास त्यात हिस्सा मागण्यास सिडको रहिवाशांच्या दरवाज्यावर येऊन उभी राहणार आहे. हा एफएसआय द्यायचाच होता तर सिडकोने इतकी वर्षे रहिवाशांच्या सहनशीलतेचा अंत का पाहिला असा सवाल उपस्थित केला जात आहे. वाशी येथील जेएनवन-जेएनटू प्रकारातील इमारतींतील अनेक कुंटुंब आज संक्रमण शिबिरात राहत आहे. सिडकोने बांधलेल्या या संक्रमण शिबिरांचीही आता वाईट स्थिती झाली आहे. त्यामुळे सिडकोच्या मध्यस्थीने एखाद्या बिल्डरने आमची घरे बांधून द्यावीत इतका विश्वास सिडकोवर राहिलेला नाही. सिडकोला मिळणाऱ्या फायद्यामुळे दोन एफएसआयला नकार देणारी सिडको एकदम तीन एफएसआयची पुरस्कर्ती झाली आहे. सिडको दीड एफएसआय रहिवाशांना देण्यास तयार आहे. खासगी बिल्डर आत्ताच पावणे दोन एफएसआयमध्ये घरे बांधून देण्यास तयार झालेला आहे. सिडकोने आपला हिस्सा ठेवल्याने रहिवाशांचा हिस्सा कमी झालेला आहे. तो न कळण्या इतपत रहिवाशी मूर्ख राहिलेले नाहीत. सिडकोबरोबर घरातील सुविधांबाबत चर्चा करता येणार नाही. ही चर्चा आम्ही बिल्डरबरोबर फेस टु फेस करू शकतो. रहिवाशाच्या ७० टक्के संमतीनंतर बिल्डर ठरविण्याचा अधिकार आम्हाला आहे. सिडको त्यांची योजना आमच्यावर लादू शकत नाही, असे अनेक प्रश्न रहिवाशांनी व्यक्त केले आहेत.
सिडकोचा खुळा नाद
सिडकोच्या मध्यस्थीने बांधण्यात येणाऱ्या टॉवरचा खर्च आम्हाला कसा परवडणार? खासगी विकासक हा खर्च आगाऊ देत असून त्याच्या व्याजावर आम्ही आमचा मेंटेन्स भागवणार आहोत. सिडको हे करणार आहे का? सिडकोने बांधलेले ट्रान्झिट कॅम्प टिकलेले नाहीत. बाबा आदमच्या जमान्यातील घरातील सुविधा आम्ही आता का स्वीकाराव्यात? सिडकोच्या नादाला लागण्यात आता काहीही अर्थ राहिलेला नाही
जयवंत गावडे, श्रद्धा ओनर्स अर्पाटमेंट

हा तर निव्वळ वेळखाऊपणा..
अडीच एफएसआयने वाढणाऱ्या लोकसंख्येला सामावून घेणाऱ्या सुविधा पालिकेने दिल्या आहेत. त्यामुळे अडीच एफएसआयसाठी या इमारती सज्ज असताना आता तीन एफएसआयवर कोणीतरी आक्षेप घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा या पुनर्बाधणीला विलंब लागणार आहे. तीन एफएसआय हा लाक्षणिक आनंद आहे. तो श्वाश्वत नाही. त्यामुळे सिडकोने हा लोकांसोबत टाइमपास सुरू केला आहे.
जयप्रकाश जगताप, अवनी ओनर्स अर्पाटमेट.
मंत्री, अधिकाऱ्यांनी राहून दाखवावे  
कोणताही बिल्डर सिडकोची ही ऑफर स्वीकारणार नाही. सिडकोला एफएसआय देऊन शिल्लक एफएसआयमध्ये तयार होणारी घरे म्हणजे त्याची केवळ समाजसेवा होईल. त्यामुळे आम्हाला आमचा बिल्डर ठरवू द्या. या घरातील शव किंवा आजारी माणूस आता चादरीतून खाली न्यावे लागत आहे. त्यामुळे यात वेळ दवडू नका, हवे तर एकदिवस मंत्री, अधिकाऱ्यांनी आमच्या वस्तीत येऊन राहावे
विजय म्हात्रे, जय महाराष्ट्र अर्पाटमेंट.

ही तर शुद्ध फसवणूक
एखाद्या दुकानात तुम्ही वस्तू खरेदी केलीत आणि ती खराब झाली तर त्याच दुकानातून तुम्ही दुसरी वस्तू घ्याल का असा हा प्रश्न आहे. सिडकोने गेली ३० वर्षे लोकांची फसवणूक केली आहे आणि त्याच सिडकोच्या मध्यस्थीने पुन्हा या घरांची पुनर्बाधणी करायची का? अडीच एफएसआयचे सर्व सोपस्कर झालेले आहेत. तेव्हा त्या क्षेत्रफळाने हे काम प्रथम होऊ द्या, नंतर अर्धा एफएसआय सिडकोने आरामात घ्यावा.
अशोक पठार,  एकता अर्पाटमेंट.