नवी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार नवे पोलीस आयुक्त के.एल.प्रसाद यांनी शुक्रवारी स्वीकारला. मावळते आयुक्त अशोक शर्मा यांच्याकडून त्यांनी पदाची सुत्रे स्वीकारली. निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर १५ फेब्रुवारी रोजी राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बद्दल्या करण्यात आल्या. राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त के. एल. प्रसाद यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.  चौदा दिवसानंतर त्यांनी आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारली. पदभार स्वीकारल्यानंतर सर्व उच्चस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी नवी मुंबईतील गुन्ह्य़ाची माहिती घेतली.
शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच हायप्रोफाईल गुन्ह्य़ामध्ये नवी मुंबई पोलिसांवर झालेल्या आरोपांच्या पाश्वभूमीवर पोलीस दलाची प्रतिमा उंचाविण्यासोबत त्यांना अधिकाऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करावा लागणार आहे.