एखाद्या यशस्वी नाटकावर चित्रपट तयार करण्याचा मोह अनेकांना होतो. ‘लोच्या झाला रे’ या नाटकावरून ‘खोखो’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाल्यानंतर आता पुढील महिन्यात आणखी एका धम्माल यशस्वी नाटकावर एक चित्रपट प्रदर्शित होत आहे. क्षितीज पटवर्धन लिखित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित ‘नवा गडी नवं राज्य’ या यशस्वी नाटकाच्या कथेवर बेतलेला ‘टाइम प्लिज – लव्हस्टोरी.. लग्नानंतरची’ हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात नाटकातीलच यशस्वी जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत मुख्य भूमिकेत असून त्यांच्या साथीला सिद्धार्थ जाधव आणि सई ताम्हणकर असतील.‘टाइम प्लिज’च्या निमित्ताने आम्ही नाटकाची संपूर्ण बांधणी मोडून काढली. नाटकाच्या चौकटीतून हा विषय बाहेर काढण्यासाठी आम्ही चार-पाच वेळा स्क्रीप्ट लिहिले. तसेच नाटकापेक्षा चित्रपटात कथेची मांडणी खूपच वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे, असे क्षितीज पटवर्धन यांनी सांगितले. एकाच कथेकडे नाटकात आणि चित्रपटात वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न आपण केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
या नाटकात चित्रपटाची बीजे असल्याचे आपल्याला नाटक करतानाच लक्षात आले होते. मात्र चित्रपट करताना नाटकाची चौकट मोडणे आवश्यक होते. त्या दृष्टीने अनेक जागा शोधून काढल्या. तसेच नाटकात फक्त उल्लेख झालेली अनेक पात्रे, स्थळे प्रत्यक्षात उभी करता आली. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शन हे नाटकापेक्षा नक्कीच वेगळा अनुभव होता, असे समीर विद्वांस यांनी सांगितले. प्रिया आणि उमेशसाठी हा पुन्हा एकदा शिकण्याचा अनुभव होता. नाटकात गृहीत धरलेल्या अनेक गोष्टी चित्रपटात प्रत्यक्षात समोर होत्या. चित्रिकरणादरम्यान आमचे नाटकाचे प्रयोगही चालू होते. त्यामुळे त्या सगळ्या नव्या अनुभवाचा फायदा आम्हाला प्रयोगादरम्यान होत होता, असे या दोघांनी सांगितले. ‘तुकाराम’, ‘आजचा दिवस माझा’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ असे विषयाच्या दृष्टीने सरस चित्रपट सादर करणारी एव्हरेस्ट एण्टरटेन्मेण्ट संस्थाच हा चित्रपट सादर करत आहे.