दुष्काळी तालुका अशीच ओळख आहे असलेल्या कर्जत तालुक्यात यंदा अधिकच बिकट स्थिती असली तरी त्यावरही मात करण्याची जिद्द बाळगून काहींचा संघर्षही सुरू आहे. त्याची निवडकच उदाहरणे असली तरी दुष्काळाची भीषणता कमी करण्यास कारणीभूत ठरेल असेच चित्र आहे. बहिरोबावाडी येथील आदर्श शेतकरी युवराज लाळगे यांनी चार एकर क्षेत्रावरील डाळिंबाची बाग याही स्थितीत जगवली आहे. काहीसा खर्चिक वाटणारा मात्र, फळबाग जगवण्याचा साधा मंत्र त्यांनी या प्रयोगातून दिला आहे.
सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळी स्थिती असल्याने माणसे व जनावरांच्या पिण्याची मारामार असताना लाळगे डाळिंबाच्या बागेसाठी चिकाटीने संघर्ष करीत आहेत. आजूबाजूच्या शेतात गवताचे पाते नजरेस पडत नाही, मात्र त्यांनी मोठय़ा कष्टाने डाळिंबाची बाग जगवली आहे. मुळच्या ठेकेदारीचा व्यवसाय मुलांकडे सोपवून लाळगे यांनी या बागेसाठी दुष्काळाशी दोन हात केले आहेत. हा परिसर अत्यंत कमी पाण्याचा म्हणुन ओळखला जातो. चार एकर क्षेत्रात त्यांनी आठ वर्षांपुर्वी डाळिंबाची लागवड केली. उंचावर पाण्याची टाकी बांधून ठिबकवर त्यांनी ही बाग फुलवली आहे. या बागेतून मागील वर्षी त्यांनी तब्बल २७ लाख रूपये उत्पन्न मिळवले. परदेशात त्यांनी डाळिंब पाठवली.
याही वर्षी पाऊस न झाल्याने भीषण स्थिती होती. १ हजार १०० पैकी ३०० झाडे तोडावी लागली. उर्वरीत झाडे जगवण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. त्यासाठी त्यांनी टँकरचे पाणी विकत घेतले. तरीही कमालीची उष्णता व कमी पडणारे पाणी यामुळे डाळिंब करपण्याचा (सन बर्निग) धोका होता. शिवाय पाणी कमी पडल्याने फळातील गोडवा, दाणे भरण्यातही अडचण येणार होती. ती वेळीच ओळखून लाळगे यांनी एक वेगळा प्रयोग केला. तब्बल तीस हजार रूपयांचे पांढरे कापड आणून त्यांनी बागेतील सर्व झाडांवर त्याचे अच्छादन केले. त्यामुळे सूर्यकिरणे थेट झाडावर येत नाही. त्याचा परिणाम लगेचच जाणवला. फळ करपण्याचा धोका तर टळलाच, शिवाय ठिबकद्वारे दिलेल्या पाण्याचे बाष्पीभवन तुलनेने खुपच घटले, त्यामुळे फळ सुरक्षित राहिले. मुख्यत्वे झाडांचा बुंधा व झाडाचा परिसर थंड राहिल्याने फळाच्या प्रतवारीवर उन्हाचा विपरीत परिणाम झाला नाही. पांढरा रंग उष्णता परावर्तीत करतो, या साध्या तंत्राचा वापर करून लाळगे यांनी यशस्वी केलेला हा प्रयोग पाहण्यास आता तालुक्यातून शेतकरी येऊ लागले आहेत. कमालीची उष्णता व कमी पाण्यात फळबाग जगवण्याचा नवा मंत्रच त्यांनी या प्रयोगाद्वारे दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2013 रोजी प्रकाशित
दुष्काळाशी दोन हात करत फळबागांसाठी नवा मंत्र
दुष्काळी तालुका अशीच ओळख आहे असलेल्या कर्जत तालुक्यात यंदा अधिकच बिकट स्थिती असली तरी त्यावरही मात करण्याची जिद्द बाळगून काहींचा संघर्षही सुरू आहे. त्याची निवडकच उदाहरणे असली तरी दुष्काळाची भीषणता कमी करण्यास कारणीभूत ठरेल असेच चित्र आहे.

First published on: 11-04-2013 at 01:13 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New strategy for fight drought for horticulture