नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) तर्फे ३० व ३१ जानेवारी रोजी आयोजित ‘निमा बँक समीट २०१३’ चे उद्घाटन रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाचे आर्थिक सल्लागार आशितोष रारावीकर व विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते तर बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक सी. व्ही. आर. राजेंद्रन् यांच्या प्रमुख उपस्थितीत निमा हाऊस येथे होणार आहे.
समारोपास रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक दीपाली जोशी, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक एम. व्ही. टांकसाळे उपस्थित राहणार आहेत. बँकांसह शासकीय उद्योगांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन एनएसआयसीचे हेमराज सिंग, तर जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक प्रदीपकुमार दाबेराव, महाव्यवस्थापक साहेबराव पाटील हे करणार आहेत.
या समीटमध्ये उद्योगांशी संबंधित कर्जासाठी अर्ज, पत प्रस्ताव, विदेशी चलन विनिमय सेवा, गट चर्चा, शेअर बाजार अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
सद्य परिस्थितीत उद्योगांना जागतिक मंदी, व्यावसायिक स्पर्धा, उत्पादनाच्या कच्या मालाच्या वाढणाऱ्या किंमती, वाहतूक खर्च आदी बाबींमुळे उत्पादन करताना खर्चाचा ताळमेळ बसविताना अडचणी येतात. उद्योजक व बँक यांच्यात समन्वय साधून उद्योगांची आर्थिक गरज पूर्ण करणे व बँकांनाही या समिटच्या माध्यमातून चांगला ग्राहक मिळणार आहे. या प्रदर्शनात उद्योजक व बँकांनी मोठय़ा प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन निमा अध्यक्ष धनंजय बेळे, मानद सरचिटणीस मंगेश पाटणकर, उपाध्यक्ष किशोर राठी यांनी केले आहे.