रणजी क्रिकेटमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केलेले भाऊसाहेब निंबाळकर यांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीचा उचित गौरव महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने केला जाईल. पुण्यातील सुब्रोतो रॉय सहारा स्टेडियममध्ये कॅप्टन निंबाळकर यांचा पुतळा उभा केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
भारतीय क्रिकेटमधील विक्रमवीर कॅप्टन भाऊसाहेब निंबाळकर यांचे नुकतेच निधन झाले. अजय शिर्के, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव संजय जगदाळे यांनी सोमवारी कॅप्टन निंबाळकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांनी कॅप्टन निंबाळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आदरांजली वाहिली.
यानंतर शिर्के यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाऊसाहेब निंबाळकर यांच्या क्रिकेटच्या ऐतिहासिक कारकिर्दीचा आढावा घेतला. ते म्हणाले, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व राज्यातील क्रिकेटपटूंसाठी कॅप्टन निंबाळकर यांच्या सर्वोच्च धावांची खेळी नेहमीच प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या गौरवशाली कार्याचा उचित गौरव केला जाईल. त्यांच्या नावाने युवा क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा विचार आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने कोल्हापूर येथे क्रिकेटचे स्वतंत्र स्टेडियम उभे करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे. कॅप्टन निंबाळकर यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा आमचा प्रयत्न राहील. या सर्व उपक्रमासंदर्भात येत्या दोन दिवसात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यामध्ये निर्णय घेतला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.