देशात महागाई, भ्रष्टाचार मोठय़ा प्रमाणात वाढला असून जनतेचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघातील जागांवर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे नेते आणि लोकसभेचे नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
नागपूर लोकसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षातर्फे नितीन गडकरी यांचे नाव जाहीर करण्यात आल्यानंतर ढोल ताशांच्या निनादात पक्षातर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकत्यार्ंशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले, आतापर्यंत पक्षातील अनेक कार्यकर्त्यांंसाठी प्रचार केल्यानंतर यावेळी प्रथमच नागपुरातून लोकसभा निवडणूक लढविण्याची संधी पक्षाने दिली आहे. नागपूर शहराचा विकास करण्याच्या उद्देशाने आजपर्यंत प्रयत्न केले आहे. गरिबांना न्याय मिळावा यासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या असून अनेकांना मदत केली आहे. केवळ सत्तेसाठी नाही तर समाजातील शेवटच्या माणसांचा विकास करण्याच्या उद्देशाने या निवडणुकीत उतरलो आहे. शहराचा विकास हाच माझा अजेंडा असून त्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
निवडणुकीत उतरण्यापूर्वी शहरात केंद्र सरकारच्या माध्यमातून २० कोटी रुपयांची कामे केली आहे. कार्यकर्ता ही माझी शक्ती असून त्यांच्या भरवशावर ही निवडणूक मी लढणार आहे. शहरात अनेक विकास कामे सुरू असताना त्यांचे श्रेय घेण्यासाठी आता धडपड सुरू झाली आहे. काँग्रेसचे अनेक नेते योजना सुरू होण्यापूर्वी उद्घाटन आणि भूमीपूजन करायला लागले आहेत. केवळ श्रेय घेण्यासाठी राजकारण करण्याची माझी सवय नाही. मिहानसारखा प्रकल्प गेल्या दहा वर्षांत पूर्ण करू शकले नाही. लोकसभेची निवडणूक गडकरी किंवा अन्य पक्षाच्या नेत्यांमध्ये असली तरी ती सामान्य माणसांच्या हक्कासाठी लढाई आहे. सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि शहराचा विकास झाला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. काम न करण्यापेक्षा निवडणुकीच्यापूर्वी श्रेय घेणारे नेते समोर येऊ लागले असून स्वतचा गवगवा करीत आहेत.
जनता आता जागृत झाली असून ते विकास करणाऱ्या उमेदवाराला मतदान करतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. गडकरी यांनी यावेळी सोनिया गांधी यांच्यावर टीका केली. निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरातील विविध भागात दुचाकी वाहनाने फिरणार असून जनतेशी संपर्क साधणार आहे. जे मतदार भाजपचे आहेत ते मतदान करतील.
मात्र, जे करीत नाहीत अशा मतदारांना विश्वासात घ्या, असे आवाहन गडकरी यांनी केले.  केजरीवाल यांना आव्हान
 आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना ते सिद्ध करावे अन्यथा त्यांनी माफी मागावी, अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली. भ्रष्टाचारी नेत्याची यादी जाहीर करताना त्यात माझा समावेश करण्यात आला आहे. कुठल्याही आरोपाला मी घाबरत नाही. गेल्या अनेक वर्षांंपासून राजकारणात काम करीत असताना भ्रष्टाचाराचा डाग नाही. मात्र, केवळ हेतूपुरस्सर बिनबुडाचे आरोप करून प्रसिद्धी मिळविण्याचा एकमेव कार्यक्रम आम आदमी पक्षाचे नेते करीत आहेत. त्यांच्याविरोधात पटियाला न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. लोकशाहीमध्ये सर्वाना बोलण्याचा अधिकार असला तरी केवळ आरोप करण्यापेक्षा ते सिद्ध करण्याची ताकद ठेवली पाहिजे. नेत्यांवर आरोप करणे हा एकमेव कार्यक्रम सध्या आम आदमी पक्षाचा असल्यामुळे जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास राहिलेला नाही, असेही गडकरी म्हणाले.