उन्हाळ्याचे दिवस असल्याने जिल्ह्य़ातील तीव्र पाणीटंचाईस प्राधान्य द्या. या कामात हलगर्जी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही आमदार संजय रायमुलकर यांनी दिला आहे.
मेहकर पंचायत समिती आमसभा व सरपंच मेळाव्यात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी महिला व बालकल्याण सभापती अंजली प्रकाश माळेकर, उपसभापती भगवानराव लहाने, जि.प. सदस्य संतोष चनखोरे, जि.प. सदस्य लता विष्णू मगर, कैलास चवरे, पं.स.सदस्य सागर पाटील, सरस्वती यशवंते, गजानन म्हस्के, संचालक माधवराव जाधव, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, खविसंचे अध्यक्ष रवी चुकेवार, खंडू सवडतकर, शैलेष सावजी, उपतालुकाप्रमुख रमेश देशमुख, जि.प. व पं.स.सदस्य उपस्थित होते.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थीस मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यात योग्य समन्वय असणे गरजेचे असून, अधिकाऱ्यांनी हा समन्वय साधण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजवावी, असे मत आमदार संजय रायमुलकर यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, दरवर्षी त्याच त्याच तक्रारींचा पाऊस आमसभेत पडतो. अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय नसल्याने हा प्रकार घडत आहे. अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून शासकीय योजनांबाबत जनजागृती करावी व लाभार्थीपर्यंत योजना पोहोचवावी. रोहयो, शेतरस्ता, वीज कंपनी, महसूल पाणीटंचाई, रस्ते आदी समस्या दरवर्षी भेडसावतात. यावर काय उपाययोजना कारता येईल, याबाबत अधिकाऱ्यांनी नियोजन करायला हवे.
विधानसभा लोकप्रतिनिधी म्हणून माझे सहकार्य घ्यावे. बरेचदा नियोजनाअभावी निधी खर्च होत नाही, ही बाब योग्य नाही. तेव्हा तो परतस न जाता मतदारसंघासाठी त्याचा वापर कसा केला जाईल, यासाठी अधिकाऱ्यांनी सदैव तत्पर राहावे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणीटंचाईस प्राधान्य देऊन या कामात हलगर्जी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही आमदार संजय रायमुलकर यांनी दिला आहे.
आमसभेत ज्या गावच्या समस्यांवर चर्चा झाली त्यात छुटी, पार्डी गावांतील पाणीपुरवठा योजनेचे काम चार वर्षांपासून अपूर्ण आहे. त्याबाबत तात्काळ चौकशीचे आदेश देण्यात आले. मेहकर ते दुर्गबोरी रस्त्याचे काम अर्धवट असून निधीअभावी ते रखडल्याचे जि.प.बांधकाम विभागाक डून सांगण्यात आले.
कासारखेड ते पेनटाकळी या रस्त्याच्या कामाच्या कंत्राटदाराने पुढील कारवाई न केल्याने पुन्हा एकदा या कामाची निविदा प्रकाशित करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
उपतालुकाप्रमुख समाधान साबळे यांच्या शिधापत्रिकाबाबतच्या तक्रारीवर पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले की, येत्या ३ ते ४ दिवसानंतर नव्या शिधापत्रिका देण्याचे काम सुरू होणार असून ग्राहकांनी आपापल्या दुकानदारांच्या अथवा पुरवठा विभागाच्या संपर्कात राहावे. देऊळगाव साकर्शासह तालुक्यातील आठ गावातील प्रादेशिक नळयोजना दुरुस्तीचे काम आठ दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन जीवन प्राधिकरण अभियंत्याने दिले.
यावेळी मोळी, पारखेड, अकोला ठाकरे, देऊळगावमाळी, लोणीगवळी, पोखरी, खामखेड, सारशीव आदी गावातील विविध समस्यांबाबत आमसभेत चर्चा झाली. देऊळगावमाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी मनमानी करतात, असा आरोप सरपंच किशोर गाभणे यांनी केला.
प्रारंभी उत्कृष्ट कार्याबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, डॉ.क्षीरसागर, डॉ.चव्हाण, ग्रामसेवक ज्ञानेश्वर चनखोरे, वागदेवचे सरपंच रमेश लठाड, तर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक गजानन देशमुख आदीचा आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक गटविकास अधिकारी आर.पी.मारोडकर यांनी अहवाल वाचन व सूत्रसंचालन शेषराव पऱ्हाड, लेखन सुधाकर पवार यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Mar 2013 रोजी प्रकाशित
पाणीटंचाई निर्मूलनाच्या कामात हलगर्जी करणाऱ्यांची गय करणार नाही
उन्हाळ्याचे दिवस असल्याने जिल्ह्य़ातील तीव्र पाणीटंचाईस प्राधान्य द्या. या कामात हलगर्जी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही आमदार संजय रायमुलकर यांनी दिला आहे.
First published on: 30-03-2013 at 04:43 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No excuse to those who negliget removal of water shortage work