प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तलावात विसर्जित न करण्याचे आवाहन गणेशभक्तांनी धुडकावल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील विविध भागातील तलावातून ४० हजारापेक्षा जास्त मूर्ती बाहेर काढण्यात आल्या असून त्यातील काही मूर्तीची जागेवरच मूर्तीकारांनी विल्हेवाट लावली तर काही महापालिकेच्या आरोग्य विभागाने संकलित करून ठेवल्या आहेत. महापालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीबाबत अनेक दावे केले असताना ते सगळे दावे फोल ठरले आहे.
विसर्जनाच्यावेळी जलाशयाजवळ चोख बंदोबस्त राहील, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ओळखणारे तज्ज्ञ राहतील, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती जमा करून कृत्रिम तलावात त्याचे विसर्जन करतील असे अनेक दावे महापालिकेने विसर्जनापूर्वी केली होते. त्यासाठी त्यांनी जनजागृती केली होती, शहरातील विविध भागातील तलावाशिवाय विविध भागात कृत्रिम टँकची व्यवस्था केली होती मात्र, त्यानंतर ३५ ते ४० हजारच्या जवळपास प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तलावात विसर्जित झाल्याने जलप्रदूषण जनजागृतीची ऐशीतैशी झाली. जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने पीओपी मूर्तीची आवक, विक्री आणि जलाशयांमधील विसर्जनावर बंदी घातली होती. त्यास पीओपी मूर्ती विक्रेत्यानी न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने स्थगिती देतानाच जलाशयामध्ये मूर्ती विसर्जित केली जाणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले होते. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसवर लाल रंगाची खूण करावी, कृत्रिम तलावामध्येच ती विसर्जित करण्याची अट घातली होती.
शहरातील विविध भागात एकूण १३० पेक्षा जास्त कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. तरीही पीओपी मूर्तीचे थेट तलावात विसर्जन करण्यात आले. शहरातील सगळ्याच तलावाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त असताना आणि विविध पर्यावरण संघटनाचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते आव्हान करीत असताना इतक्या मोठय़ा प्रमाणात लोकांनी पीओपी मूर्तीचे विसर्जन केले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यावरण आणि सामाजिक संघटनाचे शेकडो कार्यकर्ते नेमके कोणते काम करीत होते असा सवाल पर्यावरणवाद्यांनी केला आहे. कृत्रिम टँकमधून १ लाख ३४ हजार मूर्ती बाहेर काढण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. यात मातीच्या आणि पीओपी मूर्तीचा समावेश आहे. बाजारातून १ लाख ७० हजारच्या जवळपास प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची बाजारातून खरेदी करण्यात आली असल्याची माहिती मिळाली. त्यातील ८० हजारच्या जवळपास प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आल्या आहेत. सध्या सर्व मूर्ती महापालिकेच्या विविध गोदामांमध्ये ठेवण्यात आल्या असून लवकरच शहर आणि शहराबाहेर असलेल्या खाणींमध्ये शिरविण्यात येणार आहेत.