आधुनिक तंत्रज्ञानाच्या किमयेमुळे आता कालबाह्य़ झालेले अखंड गाण्याचे ध्वनिमुद्रण पुन्हा एकदा जाणीवपूर्वक करण्याचा प्रयोग येत्या शनिवारी, १३ सप्टेंबर रोजी मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये होणार आहे. विनय राजवाडे यांनी संगीतबद्ध केलेली ही बैठकीची लावणी मधुकर आरकडे यांनी लिहिली असून आदित्य ओक संगीत संयोजन करीत आहेत. सध्या या गाण्याच्या तालमी सुरू असून त्यात तब्बल १८ वादक सहभागी होणार आहेत.
ध्वनिमुद्रण क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानामुळे आता गाणे हवे तेव्हा, हवे तसे तुकडय़ा-तुकडय़ाने ध्वनिमुद्रित होते. गायक आणि वादक आपापल्या सोयीने येऊन गाण्यातील आपले योगदान देतात. त्यानंतर ते सांगीतिक तुकडे एकत्र जोडून अखंड गाणे तयार केले जाते. अगदी द्वंद्वगीतही अशा पद्धतीने ध्वनिमुद्रित होते. साधारण तीस वर्षांपूर्वी ध्वनिमुद्रण क्षेत्रातील आधुनिक संकलन प्रणालीमुळे अशा प्रकारे गाणे करता येऊ लागले. त्यामुळे सर्वाना ध्वनिमुद्रणाच्या वेळी हजर राहण्याची आवश्यकता राहिली नाही. मात्र या आधुनिकीकरणात मूळ गाणे आपला आत्मा हरवून बसते. अनेक वादकांना तर मूळ गाणे काय आहे, तेही आधी माहिती नसते. फक्त संगीतकार अथवा संगीत संयोजकांनी दिलेले विशिष्ट प्रकारचे नोटेशन वाजविले की झाले असा सारा प्रकार असतो. काळानुसार जगरहाटी बदलते, संगीतही त्याला अपवाद नाही, हे पटत असूनही बुजुर्ग गायक आणि वादकांना अनेकदा तो ‘गुजरा हुआ जमाना’ पुन्हा एकदा अवतरावा असे वाटते. त्यामुळे जाणीवपूर्वक हा प्रयोग करून पाहण्याचा निर्णय घेतल्याचे संगीतकार विनय राजवाडे यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.
आधुनिक युगात आता संगीताच्या बाजारपेठेतही आमूलाग्र बदल झाला आहे. ‘एमपीथ्री’ संस्कृतीने आल्बमचे युग संपुष्टात आले आहे. आता ऑनलाइन विक्री होणाऱ्या सिंगल्सचा जमाना आहे. एखादे गाणे ध्वनिमुद्रित करून ते अ‍ॅमॅझॉन डॉट कॉम, हंगामा डॉट कॉम, आयटय़ून्स आदी संकेतस्थळांवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाते. १२ ते १५ रुपयांना ही गाणी विकत मिळतात. मराठीतही अशा पद्धतीने गाणी ध्वनिमुद्रित होऊ लागली आहेत. शनिवारी पारंपारिक पद्धतीने ध्वनिमुद्रित होत असलेली ही बैठकीची लावणी अशाच प्रकारची एक सिंगल्स आहे. ठाण्यात झालेल्या ८४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात विनय राजवडे यांनी संगीतबद्ध केलेले राजेंद्र वैद्य लिखित ठाणे शहराचे अभिमान गीत शहरातील विविध वयोगटातील ८४ विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या गायिले होते. यू टय़ूबवर हे गाणे लोकप्रिय आहे.
दिग्गज वादकांचा मेळ
सध्याच्या भाषेत लाइव्ह पद्धतीने ध्वनिमुद्रित होत असलेल्या या गाण्यात ज्येष्ठ तबलावादक माधव पवार, ढोलकीपटू कृष्णा मुसळे, पं. उमाशंकर शुक्ल (सतार), सारेगमप फेम सत्यजीत प्रभू आदी नामांकित वादक सहभागी होत आहेत. सध्याच्या आघाडीच्या गायिका माधुरी करमरकर ही लावणी गाणार आहेत. बुधवारी दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे या गाण्याची रंगीत तालीम झाली. त्यास या गाण्याशी संबंधित सर्व कलावंतांनी भाग घेतला. शिवाय ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, संगीत संयोजक अप्पा वढावकर यांनीही आवर्जून उपस्थित राहून कलावंतांना शुभेच्छा दिल्या.