क्रीडा नैपुण्य वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना आता ५ लाख रुपयाचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालयाने केली आहे. त्यामुळे क्रीडापटूंना खेळाच्या सरावासाठी आवश्यक त्या सर्व साधनांची उपलब्धता होणार आहे. आंतरराष्ट्रीय खेळ व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा त्यामागे प्रमुख उद्देश आहे.
क्रीडा संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक कामगिरीसाठी सामोरे जातांना स्पर्धापूर्व प्रशिक्षण, आधुनिक क्रीडा साहित्य, प्रशिक्षण उपकरणे, देश-विदेशातील तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन व समतोल आहार आवश्यक असतो. आर्थिक तरतुदींअभावी खेळाडूंना या बाबींची कमतरता भासू नये, तसेच वैयक्तिक कामगिरी उंचावण्यावर प्रतिकूल परिणाम होऊ नये, म्हणून या सहाय्यक अनुदानाची योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत क्रीडा साहित्य आयात करणे, गणवेश आदी बाबींसाठी २ लाखांपर्यंत अनुदान, देशविदेशातील प्रशिक्षण, निवास, भोजन प्रवास, मार्गदर्शकांचे शुल्क यांना प्रतिवर्षी ५ लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येईल. ऑलिपिक, जागतिक अजिंक्यपद, आशियाई खेळ, तसेच एकविध खेळ संघटनेच्या आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल व युवा राष्ट्रकुल, युथ ऑलिंपिक, ज्युनिअर एशियन, ज्युनिअर विश्व अजिंक्यपद, शालेय आशियाई, राष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग घेतलेला खेळाडू यासाठी पात्र ठरतील. प्रशिक्षणासाठी  देश-विदेशातील नामांकित प्रशिक्षकांना दोन-तीन वर्षांसाठी आकर्षक मानधन देऊन करार करणे आवश्यक राहणार आहे.
राज्यातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी प्रशिक्षणांच्या कृती कार्यक्रमाद्वारे प्रथम टप्प्यात शुटिंग, अ‍ॅथ्लेटिक्स, कुस्ती खेळांना प्राधान्य देण्यात येईल.
तसेच मान्यताप्राप्त खेळ संघटनांचा देखील विचार करण्यात येईल. युथ ऑलिंपिक ज्युनिअर एशियन, ज्युनिअर विश्व अजिंक्यपद, शालेय आशियाई, राष्ट्रीय स्पर्धा १७ व १९ वयोगट, तसेच एकविध खेळ संघटनांच्या राष्ट्रीय स्तरावरील अजिंक्यपद स्पध्रेत गत तीन वर्षांत किमान दोन सुवर्णपदक धारण करणाऱ्या खेळाडूस विदेशात प्रशिक्षण, मार्गदर्शकांचे शुल्क, निवास, भोजन, प्रवास याकरिता २ लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येईल, असे क्रीडा व युवक संचालनालयाच्या सूत्रांनी सांगितले.