घाटकोपर येथे लोकलखाली येऊन दोन्ही हात गमावलेल्या मोनिकाचे जीवावरचे संकट निभावले असले तरी पुढील आयुष्य जगण्यासाठी कृत्रीम हातांसाठी तिची लढाई सुरू झाली आहे. या हातांसाठी चाळीस ते पन्नास लाख रुपये खर्च अपेक्षित असून सामाजिक संघटनांनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन रुग्णालयाकडून करण्यात आले आहे.
मोनिकाला झालेला अपघात वास्तविक प्राणघातक होता. मात्र आता ती त्यातून बाहेर पडली आहे. तिची प्रकृती सुधारत आहे. जखम भरून येण्यासाठी किमान एक महिना लागेल. संसर्ग होऊ नये व जखम वेळेत भरून यावी, यासाठी उपचार सुरू आहेत. जखम भरून आल्यानंतर तिला कृत्रिम हात लावण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे केईएम रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप भोसले म्हणाले.
शनिवारी, ११ जानेवारी रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास अपघात झाल्यानंतर घाटकोपर स्थानकावर कोणतीही वैद्यकीय मदत किंवा रुग्णवाहिकेची मदत वेळेत उपलब्ध न झाल्याने मोनिकाला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यास वेळ लागला. तेथून तिला केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मोनिकाला तिचे हात जोडण्याचा प्रयत्न केईएमच्या अस्थिव्यंग विभागातील डॉक्टरांनी केला. मात्र तिचा मोडलेला हात बर्फाच्या पिशवीत जतन केला गेला नव्हता. मोनिकाचा हात जोडताना तिला जंतुसंसर्ग होण्याचीही शक्यता होती. त्यामुळे शस्त्रक्रिया अपयशी ठरली. योग्य प्रकारे जतन केलेला हात चार तासांच्या आत जोडला गेल्यास शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता वाढते. मोनिकाच्या हाताची जखम भरल्यावर तिच्या हाताचे मोजमाप घेऊन त्यानुसार कृत्रिम हात तयार करावा लागेल. केईएममध्ये अनेकांना कृत्रीम हात लावण्यात आले आहेत. कृत्रीम हात लावल्यावर ते वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती डॉ. भोसले यांनी दिली.
कृत्रीम हात
रुग्णांनुसार वेगवेगळ्या क्षमतांचे कृत्रीम हात तयार केले जातात. सध्या उपलब्ध असलेल्या उत्तम क्षमतेच्या हातांची किंमत ४० ते ५० लाख रुपये आहे. हे हात नैसर्गिक हातांप्रमाणेच दिसतात. हे हात यांत्रिक असल्याने पाच ते सात वर्षांनी त्यातील सर्किट बदलावे लागते.
हातांचे मूलभूत काम वस्तू पकडणे असते. लिहिण्यासाठी पेन पकडणे किंवा एखादी वस्तू धरण्यासारखे काम कृत्रिम हातांनी करता येते. या हातांनी जेवताही येईल, मात्र त्यासाठी प्रशिक्षण द्यावे लागते. हे प्रशिक्षण साधारण एक वर्ष द्यावे लागते. कृत्रिम हातांनी वस्तू पकडता येत असली तरी अर्धा ते एक किलो वजनच उचलता येते. मात्र अपंगत्वावर मात करण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे.
आर्थिक मदतीचे आवाहन
मोनिका मोरे हिच्या उपचारांसाठी ५० लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांशी संपर्क साधला जात आहे. मात्र अजूनही रुग्णालयाकडे मदत आलेली नाही, असे केईएमच्या अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर म्हणाल्या. मोनिकाला मदत करण्यासाठी केईएमच्या ‘पुअर बॉक्स चॅरिटी फंड’शी संपर्क साधावा. हा निधी करमुक्त असेल.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2014 रोजी प्रकाशित
आता मोनिकाची लढाई कृत्रिम हातांसाठी..
घाटकोपर येथे लोकलखाली येऊन दोन्ही हात गमावलेल्या मोनिकाचे जीवावरचे संकट निभावले असले तरी पुढील आयुष्य जगण्यासाठी कृत्रीम हातांसाठी तिची लढाई सुरू झाली आहे.

First published on: 15-01-2014 at 07:46 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now monikas fight with artificial hand