निकास मंदिराजवळील दुर्घटना
निकालस मंदिराजवळ एक जीर्ण इमारत कोसळ्ल्याने त्यात तीन जण जखमी झाले. जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सचिन परशुराम पंडित, उमेश दयानंद पंडित आणि पंकज पंडित अशी जखमींची नावे असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
महापालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी शहरातील विविध भागातील जीर्ण इमारतीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात अनेक  इमारतींना नोटीस देण्यात येऊन त्या पाडण्याचे निर्देश देण्यात आले होते. निकालस मंदिर परिसरात शंककराव घनोटे यांचे ५० ते ६० वर्षांपूर्वीचे दुमजली घर असून ते त्यांनी काही महिन्यापूर्वी एका बिल्डरला विकले होते. त्यामुळे या घरामध्ये कोणीच राहत नव्हते. कुठल्याही क्षणी घर पडेल अशा स्थितीत ते होते, मात्र ज्या बिल्डरने ते घर घेतले त्यांनी काहीच कारवाई झालेली नाही. या घराला लागून तीन ते चार भाजी विक्रेते बसतात. आज सकाळी त्यांनी दुकान थाटले असताना अचानक पत्त्यासारखे घर कोसळले आणि त्यात भाजी विक्रेते दबले गेले.  
घर पडल्याचे वृत्त कळताच परिसरातील लोक धावले. त्यापैकी एकाला बाहेर काढले. पोलिसांना आणि अग्निशामक विभागाला माहिती देण्यात आली. या भागात सकाळी वर्दळ असल्यामुळे लोकांची गर्दी झाली होती. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या दोघांना सुरक्षित बाहेर काढल्यावर त्या तिघांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सचिन आणि उमेश पंडित हे दोघे गेल्या अनेक अनेक दिवसांपासून त्या परिसरात भाजीचा व्यवसाय करीत आहे. निकालस मंदिराजवळील भाजी बाजारात त्यांना जागा नसल्यामुळे ते तिघे घरोटे यांच्या घरासमोर बसत होते.
आज सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी भाजीचे दुकान थाटले आणि काही वेळातच इमारत पडली. दुपापर्यंत मलबा हटविण्याचे काम सुरू होते. ही इमारत पाडण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दिले होते मात्र संबंधित बिल्डरने त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्या बिल्डरवर काय कारवाई केली जाते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यान पंकज पंडितला किरकोळ मार लागल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार सुटी देण्यात आली असून अन्य दोघांवर राहाटे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घर पडल्यामुळे भाजी विक्रेत्याचे नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील
नागरिकांनी केली.