काँग्रेसने शेवटच्या क्षणी उमेदवारांचे मतदारसंघ बदलाची खेळलेली खेळी आमदार विजय वडेट्टीवार व डॉ.अविनाश वारजूकर यांना आत्मघातकी ठरण्याची शक्यता आहे. एकीकडे ब्रम्हपुरीत स्थानिक मुद्दा प्रभावी होत आहे, तर चिमुरात वारजूकरांनी सलग पाच वष्रे संपर्कच न ठेवल्याने आता शेवटच्या क्षणी मतदारांपर्यंत पोहोचतांना बरेच परिश्रम करावे लागत आहेत.
काँग्रेसने यावेळी चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांना लगतच्या ब्रम्हपुरीतून, तर माजी आमदार डॉ.अविनाश वारजूकर यांना चिमुरातून उमेदवारी दिली आहे. शेवटच्या क्षणी काँग्रेसने मतदारसंघ बदलाची खेळलेली खेळी आता काँग्रेस उमेदवारांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व नारायण राणेंसोबत काँग्रेसवासी झालेले आमदार विजय वडेट्टीवार चिमूर विधानसभा मतदारसंघातून प्रथम शिवसेना व नंतर काँग्रेसकडून विधानसभेवर निवडून गेले. सलग दोनदा चिमूरचा कठीण गड सर करणारे एकमेव आमदार, अशी त्यांची ओळख आहे, परंतु भाजपचे आमदार मितेश भांगडीयांशी वाद झाल्यानंतर वडेट्टीवारांनी चिमूरऐवजी ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाला पसंती दिली. काँग्रेस आघाडीत ही जागा राष्ट्रवादीसाठी सुटण्याची चिन्हे वर्तवली जात असतांनाच शेवटच्या क्षणी आघाडीत बिघाडी होताच काँग्रेसने पहिल्याच यादीत ब्रम्हपुरीतून वडेट्टीवारांची उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, आता सभोवतालचे कार्यकर्ते संभ्रमात पडले असून नेताच आपल्याला सोडून बाजूच्या मतदारसंघात सरकल्याने कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळेच वडेट्टीवारांच्या अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी आमदार मितेश भांगडीया या नव्या नेत्याची निवड केली. गेल्या काही दिवसात चिमूर परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार भांगडीया व त्यांचे पुत्र बंटी भांगडीयांची सोबत करून भाजपत प्रवेश केला. याचा थेट फटका चिमूरचे काँग्रेस उमेदवार डॉ. अविनाश वारजूकर यांना बसला. एकीकडे चिमूरचे निष्ठावंत कार्यकर्ते सोडून गेले, तर दुसरीकडे ब्रम्हपुरीतील काँग्रेस कार्यकर्ते त्यांना सहज स्वीकारायला तयार नसल्याने वडेट्टीवारांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
वडेट्टीवारांनी चिमूरवासियांना जिल्हा निर्मितीचे दिवास्वप्न दाखविले होते. आता तेच स्वप्न घेऊन वडेट्टीवार ब्रम्हपुरीत रिंगणात आहेत. चिमुरात स्वप्नपूर्ती करू न शकणारे वडेट्टीवार ब्रम्हपुरीला काय जिल्ह्य़ाचा दर्जा मिळवून देतील, अशीही टीका त्यांच्यावर होत आहे. मतदारसंघात कायम बदल करणे हा वडेट्टीवारांचा पूर्वेतिहास असल्याने ब्रम्हपुरीत कार्यकर्त्यांना प्रचारात गुंतवतांना त्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. चिमुरात वारजूकर सलग पाच वष्रे संपर्कातच न राहिल्याने तेथील कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. आजवर आम्हाला वडेट्टीवारांच्या रूपाने नेता होता, परंतु नवीन नेत्याशी जमवून घेतांना व नेत्याला कार्यकर्त्यांमध्ये मिसळतांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्याचा थेट परिणाम प्रचार सभांवर होत आहे. चिमूर व ब्रम्हपुरी या दोन्ही मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेसच्या एकाही बडय़ा नेत्याची सभा झालेली नाही. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची ब्रम्हपुरीत सभा लागावी म्हणून वडेट्टीवार प्रयत्नशील आहेत.  ब्रम्हपुरीच्या राजकारणात वजन ठेवून असलेले नगरविकास आघाडीचे प्रमुख अशोक भय्या यांनी दहा नगरसेवकांसह राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप गड्डमवार यांना समर्थन जाहीर केल्याने वडेट्टीवार यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. ब्रम्हपुरीचे नगराध्यक्ष राहिलेले अशोक भय्या प्रचारात सक्रीय झाल्याने राष्ट्रवादीचा जोर वाढत आहे. तिकडे माजी खासदार नरेश पुगलिया गटाचे कार्यकर्ते वडेट्टीवारांना मदत करायला तयार नाहीत. चिमुरात वारजूकरांना जनतेचा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. तरीही ब्रम्हपुरी व चिमूरमध्ये तिरंगी व दुरंगी लढतीचे चित्र बघायला मिळत आहे. ब्रम्हपुरीत भाजपचे विद्यमान आमदार प्रा. अतुल देशकर, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप गड्डमवार यांच्यात, तर चिमुरात भाजपचे बंटी भांगडीयाविरुध्द काँग्रेसचे अविनाश वारजूकर, अशी लढत रंगली आहे. सध्या तरी या दोन्ही ठिकाणी काँग्रेस उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागत आहे, परंतु ब्रम्हपुरीची परिस्थिती अतिशय वेगळी असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांना दाखविलेले आश्वासक चित्र काँग्रेस व राष्ट्रवादीसाठी अतिशय धोकादायक आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत मारपीट
शनिवारी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची जाहीरसभा संपल्यानंतर सावली तालुक्यातील गेव्हरा येथे काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपसात भिडले. यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांना चांगलाच चोप दिला. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत जाणार होते, परंतु काहींनी दोन्ही पक्ष उमेदवारांची समजूत घातल्यानंतर प्रकरण तेथेच निपटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On last moment changing party will be harmful for vadettivar and varajukar
First published on: 07-10-2014 at 07:55 IST