ठाणे शहरात दोन लाखांच्या बनावट नोटा सापडल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यात बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त होऊ लागला असून ठाणे पोलिसांनी आता त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवली आहेत. भारतामध्ये या व्यवसायात सक्रिय असलेल्या टोळ्यांना सुमारे एक लाख रुपयांच्या बनावट नोटा अवघ्या ३० ते ३५ हजार रुपयांत मिळतात तर त्या नोटा चलनात आणणाऱ्या दलालांना १३ ते १५ टक्के  कमिशन मिळते, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेश या देशात बनावट नोटा तयार करण्याचे कारखाने असून तेथून या नोटा भारतामध्ये छुप्या मार्गाने आणण्यात येतात. बांगलादेश आणि पश्चिम बंगाल राज्याच्या सीमेवरील मालदा या गावातून अशा प्रकारच्या नोटा आणण्यात येत असल्याचे यापूर्वीच्या कारवाईतून समोर आले आहे.
बनावट नोटांच्या व्यवसायात सक्रिय असलेल्या टोळ्या मालदा या गावातून झारखंड मार्गे भारतातील वेगवेगळ्या भागांत अशा नोटा चलनात आणण्याचे काम करतात. ठाण्यात दोन लाखांच्या बनावट नोटा चलनात आणण्यासाठी आलेला मुबारक शेख आणि त्याची पत्नी मर्जिना हे मूळचे झारखंडचे रहिवाशी आहेत. त्यामुळे या नोटा मालदा या गावातूनच राज्यात आल्याचा संशय आहे. तसेच या दाम्पत्याला यापूर्वीही बनावट नोटांप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून साडेतीन लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. महिनाभरापूर्वीच हे दाम्पत्य जामिनावर बाहेर आले आहे. असे असतानाही त्यांच्याकडे पुन्हा बनावट नोटा सापडल्या आहेत. त्यामुळे भारतात बनावट नोटांचे जाळे पसरविणाऱ्या मोठय़ा टोळीशी या दाम्पत्याचा संबंध असल्याचा संशय व्यक्त होत असून त्या दिशेने आता तपास सुरू केला आहे, अशी माहिती ठाणे मध्यवर्ती शोध गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी दिली.
बनावट नोटातून कमाई
भारतामध्ये या व्यवसायात सक्रिय असलेल्या टोळ्यांना सुमारे एक लाख रुपयांच्या बनावट नोटा अवघ्या ३० ते ३५ हजार रुपयांत मिळतात. काही वेळा त्यांना १५ ते २० हजार रुपयांतही इतक्या नोटा मिळतात. तसेच या बनावट नोटा भारताच्या चलनात आणणाऱ्या दलालांना १३ ते १५ टक्के कमिशन मिळते. त्याचप्रमाणे या दलालामार्फत नोटा विकत घेणाऱ्या टोळ्यांना थेट ५० टक्के  रक्कम मिळते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी दिली.