पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला विविध क्षेत्रात काम करीत असल्याचे बोलले जात असले तरी विधानसभा निवडणुकीत मात्र महिला उमेदवारांचे प्रमाण नगण्य असून त्याकडे विविध राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले आहे. नागपूरमधील सहा मतदारसंघातून ११६ उमेदवार रिंगणात असताना त्यात केवळ ७ महिलांचा समावेश आहे. तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघातील ९४ उमेदवारांमध्ये फक्त ५ महिला उमेदवार रिंगणात आहेत. यातील प्रमुख राजकीय पक्षाची एकच महिला उमेदवार असून अन्य महिला या अपक्ष म्हणून लढत आहेत. जिल्ह्य़ात २०० उमेदवारांमध्ये १२ महिला रिंगणात आहे. हे प्रमाण जिल्ह्य़ात केवळ ६ टक्के असले तरी त्या विरोधात एकही महिला संघटना समोर आलेली नाही.
राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याची केवळ घोषणा करण्यात आली. मात्र, निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्षांकडून त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. दक्षिण नागपूर मतदारसंघात एकूण १८ उमेदवार असताना त्यात केवळ बसपच्या सत्यभामा लोखंडे यांचा समावेश आहे. लोखंडे या विश्वकर्मानगर भागाच्या नगरसेविका असून त्या प्रथमच विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.
पश्चिम नागपूर मतदारसंघात २२ उमेदवार असून त्यात राष्ट्रवादीच्या प्रगती पाटीलसह गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या आनंदी सयाम आणि अपक्ष उमेदवार अनिता टेकाम या तीन महिलांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या प्रगती पाटील या दोनदा नगरसेविका झाल्या असून त्यांच्याकडे महापालिकेच्या पक्षाची गटनेते पदाची जबाबदारी आहे. राष्ट्रीय पक्षांमध्ये शहरात केवळ राष्ट्रवादीने एकमेव महिला उमेदवार दिली आहे. याशिवाय, आनंदी सयाम आणि अनिता टेकाम या दोघीही प्रथमच निवडणूक लढवत आहेत.
मध्य नागपूर मतदारसंघातून केवळ आभा पांडे या एकमेव महिला उमेदवार आहेत. त्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष असून त्या नगरसेविका आहे. मध्य नागपुरातून त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, ती नाकारण्यात आल्याने बंडखोरी करून त्या निवडणूक रिंगणात आहेत. व्यापारी क्षेत्र असलेल्या इतवारी भागात त्यांचे प्राबल्य आहे. शिवाय, महापालिकेत अभ्यासू नगरसेविका म्हणून त्यांची ख्याती आहे. दक्षिण-पश्चिम मतदारसंघात भारती मेश्राम, तर उत्तर नागपुरातून नीता वासनिक या दोन्ही महिला अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. मेश्राम आणि वासनिक सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून त्यांनी आपल्या मतदारसंघात विविध उपक्रम राबविले आहेत.
रामटेक लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघात फक्त ५ महिला उमेदवार रिंगणात आहेत. यातील प्रमुख राजकीय पक्षाची एकच महिला उमेदवार असून अन्य महिला या अपक्ष म्हणून लढत आहेत. या सहा मतदारसंघात एकूण ९४ उमेदवार आहेत. यातील सावनेर आणि उमरेड मतदारसंघात महिलांना कुठलेच स्थान नाही. काँग्रेसने एका महिलेला उमेदवारी देऊन लाज राखली आहे. भाजप, सेना, राष्ट्रवादी आणि मनसेने एकाही महिलेला उमेदवारी न देता संकुचितपणा दाखवला आहे.
हिंगणा, काटोल, रामटेक या मतदारसंघात प्रत्येकी एक, तर कामठी मतदारसंघात दोन महिला पुरुषांशी लढत आहेत. हिंगणा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे कुंदा राऊत रिंगणात आहेत. त्यांना राजकीय वारसा लाभला आहे. त्या यापूर्वी जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या.
काटोल मतदारसंघातून गायत्री पांडुरंग घरत या स्वतंत्र उमेदवार म्हणून लढत आहेत. त्या बी.ए.तृतीय वर्षांला आहेत. मोवाड येथील असलेल्या गायत्री घरत यांना समाजकारणाची आवड आहे. कामठी मतदारसंघातून बहुजन मुक्ती पार्टीतर्फे हेमलता भाऊराव पाटील बी.ए. झाल्या आहेत. मूळ कामठी येथील असलेल्या हेमलता महिलांच्या आत्मसन्मानासाठी लढत आहेत. याच मतदारसंघातून स्वतंत्र उमेदवार म्हणून छाया राजू मदनकर लढत असून या दहावी उत्तीर्ण आहेत.
रामटेक मतदारसंघातून एकमेव राणी राजश्रीदेवी बुलंदशाह असून त्या गोंडवाना गणतंत्र पार्टीतर्फे लढत आहेत. त्या मूळ महाल, नागपूर येथील रहिवासी असून त्यांचा राजघराण्याशी संबंध आहे.