राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पावणे चार लाख विद्यार्थ्यांच्या सुमारे ४० लाख उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केवळ चार हजार शिक्षक करीत असल्याने सुमार मूल्यांकनामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यातील दहा विद्यापीठांपैकी सर्वात जास्त संलग्नित महाविद्यालये नागपूर विद्यापीठात आहेत. त्यातील १७० महाविद्यालये तर अलीकडेच गोंडवाना विद्यापीठात गेली आहेत. तरीही पारंपरिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांची ८२७ अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालये विद्यापीठाला संलग्नित आहेत. शासनासह विद्यापीठानेही राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या ‘हितचिंतकांना’ महाविद्यालयांची खैरात वाटली. ही खैरात वाटण्यात विद्यापीठाचा बीसीयुडी विभाग सक्रिय आहे. विद्यापीठाशी संलग्नित निम्म्या महाविद्यालयांत प्राचार्यासह मान्यताप्राप्त शिक्षक असते तरी विद्यापीठाच्या निकालात फरक पडला असता, असा मतप्रवाह आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार नागपूर विद्यापीठाशी संलग्नित १६० अनुदानित महाविद्यालये आहेत. त्यातील सर्वच जागा भरलेल्या नाहीत. तरीही खाजगी महाविद्यालयांच्या तुलनेत २,५०० मान्यताप्राप्त शिक्षक या अनुदानित महाविद्यालयांमध्ये आहेत. खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये ६६७ आहेत. त्यामध्ये केवळ १,४०० मान्यताप्राप्त शिक्षक आहेत. विद्यापीठात दरवर्षी उन्हाळी आणि हिवाळी परीक्षा मिळून ४० लाख उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी असतात. उत्तरपत्रिकांची भली मोठी संख्या पाहता त्या प्रमाणात शिक्षक उपलब्ध नसल्याने निकाल उशिरा लागणे, पुनर्मूल्यांकनाची समस्या आणि त्याही पुढे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रकार घडतात.
अभियांत्रिकी महाविद्यालयांसह बहुतेक व्यावसायिक अभ्यासक्रमांचे मान्यताप्राप्त शिक्षकच नाहीत. बीबीए, बीसीएस, बीसीसीए, डीबीएम, फॅशन डिझाईन, जनसंवाद, एमबीए इत्यादी विषय असलेले महाविद्यालये केवळ कॉन्ट्रिब्युटरीजच्या भरवशावर सुरू आहेत. ही बहुतेक महाविद्यालये नेत्यांची आहेत. मान्यताप्राप्त शिक्षक नसल्याने याच शिक्षकांकडून मूल्यांकन करून घेतले जाते. पेपर सेट करणारे मान्यताप्राप्त शिक्षक आणि उत्तरपत्रिका तपासणारे कॉन्ट्रिब्युटरीज यात मेळ बसत नसल्याने त्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होते. एकतर विद्यार्थी नापास होतात किंवा कमी गुण मिळाल्याने तणावग्रस्त होतात.
गेल्या एक महिन्यापासून विद्यापीठातील विविध विभागांमधील अधिव्याख्यात्यांच्या नियुक्तया ताबडतोब थांबवाव्यात अशी तक्रार सुनील मिश्रा यांनी राज्यपालांकडे केली आहे. मान्यताप्राप्त शिक्षक नसल्याली ३३८ महाविद्यालये आणि त्यानंतरची सुधारित २५० महाविद्यालयांची यादीवरून उडालेला धुराळा अद्याप शांत व्हायचाच आहे. यासंबंधीची मिश्राची तक्रार न्यायालयात प्रलंबित आहे. त्या पाश्र्वभूमीवर विद्यापीठात सुरू असलेल्या विविध मुलाखतींसाठीच्या निवड समितीचे प्रमुख कुलगुरू डॉ. विलास सपकाळ आहेत. मुलाखतींचा आर्थिक देवाणघेवाणीशी घनिष्ठ संबंध असल्याचे मिश्राने राज्यपालांना पाठवलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मिश्राने अशीच एक तक्रार कुलगुरूंच्या विरोधात काही दिवसांपूर्वी केली होती. डॉ. सपकाळ यांचे पुतणे वैभव राजीव सपकाळ यांचेही नाव उमेदवारांच्या यादीत होते. मिश्राच्या तक्रारीमुळे राज्यपालांनी यासंबंधी कुलगुरूंना स्पष्टीकरण मागितल्याने वैभव सपकाळ यांना उमेदवारी मागे घ्यावी लागल्याचे प्रकरण ताजे आहे.