वाङ्मयविश्व
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजवरच्या ८६ वर्षांच्या इतिहासात अवघ्या चार लेखिकांना संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला आहे. सासवड येथे होणाऱ्या आगामी ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कवियित्री आणि समिक्षिका प्रभा गणोरकर यांनी संमेलनाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी तरी संमेलनाध्यक्षपदाचा मान एखाद्या लेखिकेला मिळतो का, याकडे साहित्य वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आजवर झालेल्या साहित्य संमेलनांच्या अध्यक्षपदी केवळ चारच महिला लेखिकांना हा सन्मान का मिळाला, याची चर्चा अधूनमधून होतच असते. यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात चिपळूण येथे झालेल्या साहित्य संमेलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही आपल्या भाषणात याचा उल्लेख केला होता.  ११ मे १८७८ रोजी पुण्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘ग्रंथकार संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात समजली जाते. त्यानंतर १९६० पर्यंत एकाही लेखिकेची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली नव्हती. कथाकार कुसुमावती देशपांडे या १९६१ मध्ये ग्वाल्हेर येथे झालेल्या ४३ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या. साहित्य संमेलनाच्या इतिहासातील पहिल्या महिला संमेलनाध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला.त्यानंतर १९७५ मध्ये कराड येथे झालेल्या ५१ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान दुर्गाबाई भागवत यांना मिळाला. त्यानंतर २० वर्षे एकही लेखिका संमेलनाध्यक्ष होऊ शकली नाही. १९९६ मध्ये आळंदी येथे झालेल्या ६९ व्या संमेलनाच्या अध्यक्ष होण्याचा मान शांता शेळके यांना मिळाला आणि इंदूर येथे २००१ मध्ये झालेल्या ७४ व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. विजया राजाध्यक्ष निवडून आल्या. या चार लेखिका वगळता अद्याप अन्य कोणाही लेखिकेला हा बहुमान मिळाला नाही. काही वर्षांपूर्वी मीना नेरुरकर, प्रतिमा इंगोले, गिरिजा किर आदींनी संमेलनाध्यक्ष निवडणुकीत सहभाग घेतला होता. पण त्यांना ही संधी मिळाली नाही. आता प्रभा गणोरकर यांनी संमेलनाध्यक्ष निवडणुकीत अर्ज दाखल केल्याने  ‘चारचौघी’ शिवाय अन्य कोणा लेखिकेला संमेलनाध्यक्षपद मिळते का, हा औत्स्युक्याचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे.